Reserve Bank of India’s repo rate hiked by half a percentage point
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो दरात अर्ध्या टक्क्यांनी वाढ
चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनात 7.0% दराने वाढीचा अंदाज
प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करण्यात येणार
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्यानी वाढ केली असून, आता रेपो दर पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे. बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं.
या दर वाढीमुळे स्थायी ठेव सुविधा – एसडीएफ दर 5.65% आणि किरकोळ स्थायी सुविधा – एमएसएफ दर तसेच बँक दर 6.15% इतका झाला आहे. या वाढीचे समर्थन करताना, पतधोरण समितीने, वाढीला प्रोत्साहन देतानाच महागाई आटोक्यात राखण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.
या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनातली वाढ अपेक्षेपेक्षा कमी, म्हणजे साडे १३ टक्के आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत ही सर्वाधिक वाढ असल्याचं दास यांनी सांगितलं. कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्धाचा, जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे.
महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा पाच विरुद्ध एक अशा बहुमतानं घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
देशातल्या ग्रामीण भागात मागणी वाढली असून, गुंतवणुकीतही सुधारणा दिसून येत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर सहा टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केला.
मार्च २००० पासून ऑनलाईन ई-वाणिज्य व्यवहारांना लागू असलेलं नियमन हे सध्या प्रत्यक्ष व्यवहारांनाही लागू असल्याचं आज रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं.
क्षेत्रीय ग्रामीण बॅंका सध्या रिझर्व्ह बॅंकेच्या पूर्व परवानगीनं मंजुरीनं ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सुविधा देऊ शकतात, असं रिझर्व बँकेनं सांगितलं.
रेपो दरात रिझर्व्ह बँकेनं केलेली अर्ध्या टक्क्याची वाढ ही उद्योग क्षेत्राच्या अपेक्षेप्रमाणेच असल्याचं आयएमसीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी आज सांगितलं. बाह्य आणि अंतर्गत समतोल राखण्यासाठी जागतिक मध्यवर्ती बॅंकांनी घेतलेल्या भूमिकेला धरून हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com