Review meeting of National Highways works concluded
राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची आढावा बैठक संपन्न
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांना गती द्या- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे : पुणे शहरातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अस्तित्वातील पूल पाडून नवीन बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचे काम गतीने व्हावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या.
जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेल येथे पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, राहुल कुल, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, पुणे- बेंगळुरू महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी अस्तित्वातील पूल पाडून हा रस्ता सहापदरी करणे तसेच सेवा रस्त्याच्या कामाला गती द्यावी. सेवा रस्त्यासाठीच्या भूसंपादनातील अडथळ्यावंर मार्ग काढून तातडीने जमीन संपादनाचे आदेश (अवॉर्ड) जारी करावेत. भूसंपादनातील अडथळे दूर करण्यासाठी वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती करावी. जुन्या पुलाच्या तोडकामानंतरच्या राडारोड्याचा उपयोग शहरातीलच विविध प्रकल्पांच्या भरावांसाठी करावा, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, प्रस्तावित नवीन पुलाचे बांधकाम गतीने व्हावे यासाठी बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पर्याय तपासून योग्य तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. नवीन पूल जून २०२३ पूर्वी पूर्ण होईल असे नियोजन करावे. तोपर्यंत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यापुढे शहरातून जाणाऱ्या इलेव्हेटेड महामार्गांचा आराखडा करताना बहुमजली पूल करावेत. कोणतेही पूल, रस्त्यांचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) करताना पुढील २५ वर्षांचे नियोजन करावे, असेही श्री. गडकरी म्हणाले.
यावेळी श्री. गडकरी यांनी विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत सद्यस्थितीचा आढावा घेऊन निर्देश दिले. यामध्ये पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ अंतर्गत देहूरोड ते सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी व अपघातांवर उपाययोजनांसाठी अतिरिक्त कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करणे, पुणे सोलापूर रा. मा. क्र. ६५ च्या हडपसर ते यवत या भागातील वाहतूक कोंडी व अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांसाठी इलेव्हेटेड महामार्ग करण्याचे नियोजन, नाशिक फाटा ते खेड रा. मा. क्र. ६०, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आदी कामांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसाठी जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने विविध पर्याय द्यावेत, असे श्री. गडकरी यावेळी म्हणाले.
यावेळी एनएचएआयचे मुंबई प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव यांनी महामार्गांच्या कामांच्या सद्यस्थिती व नियोजनाबाबत सादरीकरण केले. बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पीएमआरडीचे महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, एनएचएआयचे महाराष्ट्र राज्य प्रादेशिक अधिकारी राजीव श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग- राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे आदी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com