Rishi Sunak is the Prime Minister of United Kingdom
युनायटेड किंगडमच्या प्रधानमंत्रीपदी विराजमान
युकेचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आता देशाच्या प्रधानमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राजे चार्ल्स तृतीय यांची आज त्यांनी बकिंगहॅम राजवाड्यात जाऊन भेट घेतली. संवैधानिक राजेशाहीमध्ये, राजा सरकारी नेत्यांची नियुक्ती करण्यात औपचारिक भूमिका बजावतो.
राजे चार्ल्स तृतीय यांनी मावळत्या प्रधानमंत्री लिझ ट्रस यांचा राजीनामा औपचारिकरीत्या स्वीकारला आणि सुनक यांना नवीन सरकारस्थापनेचं आमंत्रण दिलं.
प्रधानमंत्री या नात्याने १० डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानी केलेल्या पहिल्या भाषणात सुनक म्हणाले की युनायटेड किंग्डम सध्या गंभीर आर्थिक पेचप्रसंगातून जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवावा, आपण तो सार्थ ठरवू असं आवाहन त्यांनी केलं.
मावळत्या प्रधानमंत्री लिझ ट्रस यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचं समर्थन केलं. ४२ वर्षाचे ऋषी सुनक गेल्या दोनशे वर्षातले ब्रिटनचे सर्वात तरुण प्रधानमंत्री आहेत. देशाला आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर काढण्याबरोबरच त्यांच्यासमोर पक्षांतर्गत कलह थांबवण्याचंही आव्हान आहे. ते तातडीनं मंत्रिमंडळाची नियुक्ती करतील अशी शक्यता आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रिषी सुनक यांचं युकेचे प्रधानमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सुनक यांना दिवाळीच्या विशेष शुभेच्छा देतानाच जागतिक मुद्द्यांवर त्यांच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com