Rituja Latke’s victory is an explanation of the public’s lack of faith in the government
ऋतुजा लटके यांचा झालेला दणदणीत विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचं स्पष्ट करणारा- नाना पटोले
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नव्हे तर जणू गुजरातचे मुख्यमंत्री वाटतात
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा झालेला दणदणीत विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचं स्पष्ट करणारा आहे,अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या मतदारसंघात भाजपा आणि शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणूक लढवण्याचा त्यांनी अट्टाहास केला होता. एखाद्या सदस्याचं निधन झालं, तर ती जागा बिनविरोध व्हावी, अशी राज्याची राजकीय परंपरा आहे.
मात्र, भारतीय जनता पक्षाने या परंपरेला तिलांजली देत उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापूर, देगलूर, पंढरपूर या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाने उमेदवार दिले होते. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत राज्याची परंपरा राखल्याचा भाजपाचा दावा खोटा आहे.
या मतदारसंघात आपला निभाव लागणार नाही, याची त्यांना जाणीव होताच त्यांनी माघार घेतली. अंधेरीतील विजय हा शिंदे गट आणि भाजपाला मोठा धडा शिकवणारा असून महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव निश्चित करणारा आहे, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नव्हे तर जणू गुजरातचे मुख्यमंत्री वाटतात
महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्यानं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नव्हे तर जणू गुजरातचे मुख्यमंत्री वाटतात, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
आज त्यांनी यवतमाळ मध्ये काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसह चालण्याचा सराव केला. त्यानंतर ते बोलत होते. सुदृढ शरीर असेल तर देश निरोगी राहील, असं ते म्हणाले.
गेल्या आठ वर्षात देशातली खेळाडू वृत्ती संपली आहे, द्वेष पसरवण्याचं काम केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर, खेळाडू वृत्ती अंगी बाळगण्यासाठी राहुल गांधी यांनी देशात भारत जोडो यात्रा सूरू केली आहे, असं पटोले यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com