Rs.32 Lahks fined from 619 establishments
६१९ आस्थापनांकडून ३२ लाख रुपये दंडवसुली
वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या कारवाईत ६१९ आस्थापनांकडून ३२ लाख रुपये दंडवसुली
पुणे : अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून २०२२-२३ या वर्षामध्ये फेब्रुवारी २०२३ अखेर वैध मापन शास्त्र नियमांचा भंग केल्याबद्दल जिल्ह्यातील विविध ६१९ आस्थापनांवर दंडात्मक कारवाईद्वारे ३२ लाख ६० हजार ७०० रूपये इतके प्रशमन शुल्क शासनास जमा करण्यात आले आहे.
नुकतीच वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून चिकन, मटन विक्रेते आस्थापनांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये १०० आस्थापनांची तपासणी करुन दोषी आढळलेल्या ६० आस्थापनांवर खटले दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई केली आहे.
आवेष्टित वस्तुंवर नियमानुसार घोषवाक्ये नसणे, मूळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने वस्तू विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या डिलीव्हरी बॉयकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाते.
ग्राहकांना विविध विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करताना नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्यांनी नियंत्रक कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६२२०२२, ०२०-२६१३७११४ व व्हॉट्सॲप क्रमांक ९८६९६९१६६६ किंवा ई-मेल आयडी dclmms_complaints@yahoo.in यावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र संजीव कवरे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com