Uddhav Thackeray’s demand for Rs 50,000 per hectare as compensation for rain
पावसानं झालेल्या नुकसानभरपाईदाखल हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी
औरंगाबाद: परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं, अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते.
मदतीची ही मागणी शेतकऱ्यांनी केली असून, त्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सध्याचं सरकार हे उत्सवी सरकार असून त्यांच्याकडे भावनेचा दुष्काळ असल्याची टीका ठाकरे यांनी केली. उत्सव साजरे करा पण आपली प्रजा ही सुखी, समाधानी आहे का? हे देखील पहिले पाहिजे.
हे सरकार बेदकरपने सांगत की, ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्थिती नाही. त्यामुळे आता मंत्र्यांना चिखलात बुडवलं पाहिजे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. पंचनामे आणि इतर कार्यवाही होत राहील, मात्र नुकसानग्रस्तांना तातडीनं दिली पाहिजे.
कोरोना काळात ठप्प झालेली राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांनी सांभाळली, आता हाच शेतकरी अडचणीत आहे, तेव्हा त्याला आधार द्यावा यासाठी सरकारला भाग पाडूया, असं ते म्हणाले.
ठाकरे यांनी काल औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या दहेगाव शिवार आणि पेंढापूरला भेट दिली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
आपल्या नुकसानीशी संबंधित सर्व माहिती एकत्र करून ठेवावी त्याआधारे आपण सरकारशी चर्चा करूया असं ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, ठाकरे यांना मराठवाडा दौरा करण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांचा हा दौरा राजकीय नाटक असल्याची टीका प्रदेश भाजपानं केली आहे
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com