RTO warns of strict action against illegal bike taxi services, Appeal to citizens not to avail of this service
अवैध बाईक टॅक्सी सेवेविरुद्ध कठोर कारवाईचा आरटीओचा इशारा
या सेवेचा लाभ न घेण्याचे नागरिकांना आवाहन
पुणे : ओला, उबेर, रॅपिडो आदी कंपन्यांकडून संकेतस्थळ, मोबाईल ॲपच्या माध्यमातून अवैधरित्या बाईक (दुचाकी) टॅक्सी सेवा सुरू असल्याचे आढळून आले असून अशा वाहनांवर कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे कडून विशेष पथक नेमण्यात आलेले आहे. अशा सेवेविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनाही आपला जीव धोक्यात घालून अशी बेकायदेशीर व धोकादायक सेवेचा लाभ घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या या विविध कंपन्यांमार्फत दुचाकी टॅक्सी सेवा सुरु असल्याचे आढळून आले आहे. अशा दुचाकी/टॅक्सी साठी खाजगी संवर्गात नोंद झालेली वाहने भाडे तत्वावर वापरल्यास परवाना शर्तींचे तसेच नोंदणी नियमांचे उल्लघन होत आहे. कंपन्या अनधिकृतपणे केवळ ऑनलाईन संकेतस्थळ, ॲपच्या आधारे या सेवा देत असल्याने सेवेचा लाभ घेताना संबंधीत प्रवाशास अपघातानंतर विमा संरक्षण आदी कोणतेही कायदेशीर लाभ मिळणार नाही. तसेच अशी सेवा पुरवणारे चालक विना हेल्मेट प्रवास करत आहेत. ही बाब वाहतूक नियमास व रस्ता सुरक्षिततेस बाधा आणणारी आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये रेंट-अ मोटार सायकल योजना १९९७ उपलब्ध असून त्यामध्ये वापरात येणारी वाहने भाडोत्री परिवहन संवर्गात नोंद असणे आवश्यक आहे. तसेच कंपनी नोंद करताना विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणे बंधनकारक आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर बाईक टॅक्सी व्यवसाय सुरु करता येतो.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा अनधिकृत व बेकायदेशीर सेवेचा लाभ घेऊ नये, तसेच आपली दुचाकी वाहने या सेवेकरिता उपलब्ध करुन देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. असे केल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन कायदा कलम ६६ /१९२अ नुसार विना परवाना प्रवाशांची वाहतूक केल्याच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येईल. यामध्ये न्यायालयीन कारवाई होऊ शकते.
कंपन्यांनी अनधिकृत व बेकायदेशीर रित्या सुरु असणारी बाईक टॅक्सी सेवा त्वरीत बंद करावी. तरी अशी सेवा सुरु असल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी कळवले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com