New rules issued for Holi and Dhulivandana
होळी आणि धुलिवंदनासाठी नवी नियमावली जारी
मुंबई : होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक आहे, डीजे लावायला मनाई केली आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असं गृह मंत्रालनं म्हटलं आहे. कोविडचा प्रादुर्भाव अजूनही असल्यानं मास्कचा वापर, सामाजिक अंतराचा नियम पाळणं गरजेचं आहे. राज्यात सध्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यानं ध्वनीवर्धक लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे उपमुख्यमंत्री अजित पवार
“समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण साजरा करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घ्या.
वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्राच्या गावखेड्यात, विशेषत: कोकणात साजरा होणारा होळीचा सण यंदाही आनंदात, उत्साहात साजरा होऊ दे. समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अनिष्ठ रुढी, परंपरांचा विनाश होऊ दे. राज्यातल्या घराघरात, मनामनात ज्ञानाचा प्रकाश उजळू दे.
होळी व धुलीवंदन साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळावा, नैसर्गिक रंगाचा वापर करावा. डोळे व त्वचेला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन सुरक्षित होळी साजरी करा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.