Sahakar Bharti’s resounding victory in the Maharashtra Nagari Sahakari Bank Federation elections
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन निवडणुकीत सहकार भारतीचा दणदणीत विजय
सहकार भारतीचे १५ उमेदवार विजयी
मुंबई : दि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १५ जागांवर विजय मिळवत सहकार भारती पुरस्कृत सहकार पॅनलने एकतर्फी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सहकार भारतीने संपादन केलेले हे यश सहकारी बँकींग क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरण्याची प्रतिक्रिया सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी दिली आहे.
फेडरेशनच्या २१ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सहकार भारती पुरस्कृत सहकार पॅनलचे तब्बल १२ उमेदवार अविरोध निवडून आले. महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधीत्व करणारी शिखर संस्था असून महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.
विजयी उमेदवारांमध्ये श्री. अजय ब्रम्हेचा (नाशिक), डॉ शशिताई अहिरे (नाशिक), सौ. वैशालीताई आवाडे (इचलकरंजी), श्री. सत्यनारायण लोहिया (बीड), श्री. राजगोपाल मनियार (सोलापूर), श्री. सुनील देवडा (हिंगोली), श्री. निपुण कोरे (कोल्हापूर) श्री. अनिल देसाई (सातारा), श्री. सतीश गुप्त (चिखली). श्री. शंतनू जोशी (अकोला), श्री. नानासाहेब सोनवणे (नाशिक), श्री. अशोक शेळके (अहमदनगर), श्री. योगेश बन (नागपूर), श्री चंद्रहास गुजराथी (जळगाव), श्री. रत्नाकर कदम (नाशिक) यांचा समावेश आहे.
मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. संजयजी पाचपोर, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री. विवेक जुगादे व इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेत कार्यरत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच बँक फेडरेशनवर सहकार भारतीने विजय संपादन केला आहे.
महाराष्ट्रातील सर्वच नागरी सहकारी बँकांचा सहकार भारतीला भरभरून पाठिंबा असून एक नवीन नेतृत्व देण्यासाठी सहकार भारती सज्ज झाली असल्याचे सहकार भारतीचे महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगादे यांनी सांगीतले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com