Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyaan: Cleanliness campaign started in Maharashtra
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान : महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर सुरू
स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन गावे होणार चकाचक – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई : ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार असून येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
या अभियान / कार्यक्रमामध्ये निर्माण होणाऱ्या स्वच्छतेसंबंधी मत्ता, गावांमध्ये तयार होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिर्वतन व गावांगावांतून सुरु असलेल्या स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व नागरिक, ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेवून, त्यांच्या वेगवेगळ्या ग्रामपंचायती, तालुके व जिल्ह्यांत स्वच्छतेच्या विविध पैलूंतील प्रगतीबाबत एक सर्वसमावेशक स्पर्धा राबवून व त्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करून, स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्त्व पटवून देण्याकरिता, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
तसेच, राज्यात केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ ही योजना राबविण्यात येत आहे. संपूर्ण ग्रामीण स्वच्छता शाश्वत पद्धतीने टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत, ग्रामीण भागातील सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, अशा प्रकारे राज्यामध्ये सुरू असणारी ही सर्व कामे पुर्ण करून, राज्यास हागणदारी मुक्त (ODF PLUS) म्हणून घोषित करावयाचे आहे.
या सर्व कामांना गतिमान करण्यासाठी, ग्रामस्थांनी व अधिकाऱ्यांनी या कामात दिलेल्या सहभागाला प्रोत्साहित करण्यासाठी, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील स्पर्धेत यथोचित बदल करून, दिनांक ७ ऑक्टोबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये नव्याने एकत्रित सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सन २०२२-२३ चे अभियान आजपासून सुरु करण्यात आले आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून, महाराष्ट्रात स्वच्छतेचा जागर करुन, ग्रामपंचायतीत समाविष्ट गावांतील वैयक्तिक शौचालये, त्यांचा वापर, मागणी, हागणदारीमुक्त तपासणीचा अहवाल त्यानुषंगाने दुरूस्त करावयाची शौचालये, एक खड्डा ते दोन खड्डा करावयाची शौचालये, गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्याकरीता करावयाची कार्यवाही व पूर्तता याबाबत ठोस कृती कार्यक्रम आखून, दिनांक १५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत ही कार्यवाही करावयाची आहे, असे त्यांनी सांगितले.
या अभियानांतर्गत घ्यावयाच्या स्पर्धा व विविध स्तरावर संबंधित ग्रामपंचायतींना द्यावयाचे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार :
जिल्हा परिषद गट प्रथम रू.६०,०००रु., जिल्हास्तर प्रथम रू. ६ लक्ष, द्वितीय रू. ४ लक्ष, तृतीय रू. ३ लक्ष. विभागस्तर प्रथम रू.१२ लक्ष, द्वितीय रू. ९ लक्ष, तृतीय रू. ७ लक्ष राज्यस्तर प्रथम, रू.५० लक्ष, द्वितीय रू. ३५ लक्ष तृतीय रू. ३० लक्ष.
याशिवाय जिल्हा विभाग व राज्य स्तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या ग्रामपंचायती वगळून, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर संबंधित ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार ही देण्यात येणार आहेत.
विशेष पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.
- पुरस्काराचे नाव स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन. जिल्हा स्तर ५०,००० रु., विभागस्तर ७५,००० रु. राज्य स्तर ३,००,००० रु.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन. जिल्हा स्तर ५०,००० रु., विभागस्तर ७५,००० रु. राज्य स्तर ३,००,००० रु.
- स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय व्यवस्थापन. जिल्हा स्तर ५०,००० रु., विभागस्तर ७५,००० रु. राज्यस्तर ३,००,००० रु.
याशिवाय, वेगवेगळ्या महत्त्वाच्या बाबींसंदर्भातील कामगिरीकरीता ग्रामपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी व शासकीय कर्मचारी/अधिकाऱ्यांनासुध्दा अनेक पुरस्कार या स्पर्धेत देण्यात येणार आहे.
स्वच्छतेच्या या महायज्ञात नागरिक, कर्मचारी, अधिकारी तसेच, लोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग देवून, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com