A policy decision will soon be made regarding the grant of scholarships to all eligible students through BARTY
बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय
– मंत्री संजय राठोड
‘बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी या अनुषंगाने सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केली लक्षवेधी
मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत फेलोशिप देऊन संशोधनास चालना देण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातून 200 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सर्व बाबी तपासून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
‘बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी या अनुषंगाने सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री श्री.राठोड यांनी ही माहिती दिली.
मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले की ‘बार्टी’ने 2013 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती सुरु केली आहे. याबरोबरच विविध योजना आणि कार्यक्रम ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येत आहेत. सारथी आणि महाज्योती या संस्थांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना एम फिल व पी एच डी करीता अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. याचधर्तीवर ‘बार्टी’ ने सर्व पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी होत आहे. या बाबत बार्टीने शासनास प्रस्ताव सादर केला आहे.
याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.
अधिछात्रवृत्ती पात्र विद्यार्थ्यांकडून प्रबंध अप्राप्त असल्याचे लक्षात आले आहे. या अनुषंगाने ऑनलाईन निरीक्षण (मॉनिटरिंग) करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com