School students experienced the trip to the university sports complex..!
शाळकरी विद्यार्थ्यांनी अनुभवली विद्यापीठातील क्रीडासंकुलाची सफर..!
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त विद्यापीठात ‘चला, खेळ खेळूया’ उपक्रम
पालिकेच्या विद्यार्थ्यासाठी मोफत क्रीडासंकुल
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडांगण नेमके आहे तरी केवढे, तिथे कोणते खेळ खेळले जातात, या क्रीडांगणात कोणत्या सोयीसुविधा आहेत अश्या लहानग्यांच्या सर्व प्रश्नांची उकल राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘ चला, खेळ खेळूया ‘ या उपक्रमाच्या माध्यमातून झाली.
२७ एकर परिसरात वसलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडासंकुलात आयोजित या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य व क्रीडा संकुल आयोजन परिषद अध्यक्ष राजेश पांडे, अधिष्ठाता व क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.दीपक माने, डॉ.मनोहर चासकर, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, अधिसभा सदस्य संदीप कदम, विजय सोनवणे, प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी भाषणादरम्यान डॉ.कारभारी काळे म्हणाले, क्रीडा संकुलाचा हा प्रकल्प शंभर कोटींचा असून त्यातील ऐंशी कोटींचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल. या क्रीडा संकुलात भविष्यात सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव तयार व्हावेत अशी अपेक्षा आहे.
यावेळी राजेश पांडे म्हणाले, मेजर ध्यानचंद यांचे स्मरण केवळ त्यांच्या फोटोला हार न घालता या अशा उपक्रमाच्या माध्यमातून व्हावे अशी कल्पना होती म्हणून आम्ही हा उपक्रम घेतला. या निमित्ताने पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे कृदसंकुल अनुभवण्याची संधी मिळाली.
यावेळी शांताराम जाधव यांनी चांगला खेळाडू होण्यासाठी ३६० दिवस क्रीडांगणावर राहणे गरजेचे असल्याचे सांगितले तर शकुंतला खटावकर यांनी विद्यापीठातून भविष्यात अनेक मेजर ध्यानचंद निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला.
डॉ.दीपक माने म्हणाले, या क्रीडा दिवसाच्या निमित्ताने आम्ही कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, कुस्ती, शुटींग, जिमन्याशियम, ॲथलेटिक अक्टिविटी असे खेळ यावेळी मुलांनी या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांनी खेळले. यावेळी कबड्डी मुलींची व फुटबॉल मुलांची आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाही घेण्यात आली. दिवसअखेर शाळा महाविद्यालयातील अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांनी क्रीडासंकुलाला भेट दिली.
पालिकेच्या विद्यार्थ्यासाठी मोफत क्रीडासंकुल
गरीब विद्यार्थ्यांना क्रीडा संकुलाचा लाभ व्हावा व देशाला चांगले खेळाडू मिळावेत यासाठी पुणे महापालिकेच्या विद्यार्थ्यांना क्रीडा संकुल वापरण्यासाठी भविष्यात कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही असा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे व व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com