Second successful high-altitude flight test of Anti-Tank Guided Missile ‘HELINA’
रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची अतिउंचीवरील दुसरी उड्डाण चाचणी यशस्वी
नवी दिल्ली : सध्या सुरु असलेल्या वापरकर्ता प्रमाणीकरण चाचण्यांचा भाग म्हणून स्वदेशी पद्धतीने विकसित, रणगाडा विरोधी गाईडेड ‘हेलिना’क्षेपणास्त्राची अत्याधुनिक हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचा वापर करून आज 12 एप्रिल 2022 रोजी दुसरी यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारतीय हवाई दल आणि डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या पथकांनी संयुक्तपणे अतिउंचीवरील भागात ही चाचणी घेतली. गेल्या काही दिवसांतील ही सलग दुसरी यशस्वी उड्डाण चाचणी आहे.
आजची चाचणी वेगळ्या पल्ल्यासाठी आणि उंचीसाठी घेण्यात आली. आधी केलेल्या नियोजनानुसार, क्षेपणास्त्राने, विविक्षित लक्ष्याचा अचूक भेद केला. ही चाचणी लष्कराचे वरिष्ठ कमांडर्स आणि डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या समक्ष करण्यात आली. या चाचणीमुळे, या क्षेपणास्त्रामध्ये असलेल्या इन्फ्रारेड शोधक प्रतिमादर्शक यंत्रणेसह संपूर्ण प्रणालीच्या कामगिरीतील सातत्य दिसून आले. यामुळे आता ‘हेलिना’ क्षेपणास्त्राचा सशस्त्र दलांतील समावेश शक्य झाला आहे.
याआधी राजस्थानातील पोखरण येथे घेण्यात आलेल्या ‘हेलिना’ क्षेपणास्त्राच्या प्रमाणीकरण चाचण्यांतून वाळवंटी प्रदेशात या क्षेपणास्त्राची कार्यक्षमता सिद्ध झाली होती.
‘हेलिना’हे तिसऱ्या पिढीतील फायर अँड फर्गेट प्रकारातील रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र असून ते डायरेक्ट हिट आणि टॉप अटॅक अशा दोन्ही पद्धतीने मारा करू शकते. या क्षेपणास्त्रातील यंत्रणा सर्व प्रकारच्या हवामानाला अनुकूल असून अहोरात्र कार्य करण्याची क्षमता असलेली आहे. ‘हेलिना’ क्षेपणास्त्र पारंपरिक बनावटीचे रणगाडे तसेच स्फोटक-प्रतिसाद यंत्रणांनी सज्ज रणगडे अशा दोन्ही प्रकारच्या रणगाड्यांचा विनाश करू शकते.
Hadapsar News Bureau.