The country is moving towards self-reliance on the strength of wise youth: Prime Minister Narendra Modi
प्रज्ञावंत युवकांच्या बळावर देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मातृभूमी या मल्याळी दैनिकाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याचे उद्घाटन केले.
या वृत्तपत्राच्या प्रवासातील सर्व प्रमुख व्यक्तींना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. महात्मा गांधींच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला बळ देण्यासाठी मातृभूमीचा जन्म झाला”, असे ते म्हणाले. वसाहतवादी राजवटीविरुद्ध आपल्या देशातील लोकांना एकत्र आणण्यासाठी भारतभर स्थापन झालेली वृत्तपत्रे आणि नियतकालिकांच्या गौरवशाली परंपरेत त्यांनी या प्रकाशनाला स्थान दिले.भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यात वृत्तपत्रांचा वापर करणाऱ्या लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गोपाळ कृष्ण गोखले, श्यामजी कृष्ण वर्मा आणि इतरांची उदाहरणे त्यांनी दिली. आणीबाणीच्या काळात भारताची लोकशाही मूल्य अबाधित ठेवण्यासाठी एम.पी. वीरेंद्र कुमार यांच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष स्मरण केले.
प्रज्ञावंत युवकांच्या बळावर देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केलं आहे. आपल्या पिढीतल्या अनेकांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घ्यायला मिळाला नाही, मात्र स्वांत्र्यांच्या अमृत काळानं आपल्याला मजबूत, विकसित आणि सर्वसमावेशक भारताची निर्मिती करायची संधी दिली आहे असं ते म्हणाले.
आज जग भारताकडून मोठी अपेक्षा बाळगून असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी मातृभूमी दैनिकाच्या आजवरच्या वाटचालीचाही गौरव केला. मातृभूमीनं महात्मा गांधी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ द्यायचं काम केलं असं ते म्हणाले. स्वातंत्र्यलढ्याविषयी अज्ञात असलेल्या गोष्टी आणि स्वातंत्र्यविरांच्या गाथा नागरिकांपर्यंत पोचवण्यात माध्यमं महत्वाची भूमिका बजावू शकतात असंही ते म्हणाले.
दोन वर्षांत 80 कोटी लोकांना विनामूल्य शिधा मिळाला .लसींच्या 180 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.“भारतातील प्रतिभावान तरुणांच्या बळावर, आपला देश आत्मनिर्भरता किंवा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारताला देशांतर्गत आणि जागतिक गरजा भागवणारे आर्थिक शक्ती केंद्र बनवणे हा या तत्त्वाचा गाभा आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या 4 वर्षांत, युपीआय व्यवहारांची संख्या 70 पटीने वाढली आहे. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनवर 110 लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पीएम गतिशक्ती पायाभूत सुविधा निर्मिती आणि प्रशासन अधिक सुलभ करणार आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली. आम्ही भारतातील प्रत्येक गावात हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत. येणाऱ्या पिढ्यांनी सध्याच्या पिढीपेक्षा चांगली जीवनशैली जगावी हे आमच्या प्रयत्नांचे मार्गदर्शक तत्व आहे,” असे त्यांनी सांगितले.