Senior artist Mohandas Sukhtankar passed away
ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं निधन
मुंबई : मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते.
त्यांनी अनेक नाटके आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. चित्रपटसृष्टी गाजवली, रंगभूमी रंगवली. रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, दुर्गा, स्पर्श, आभाळाचे रंग, मत्स्यगंधा अशा अनेक कलाकृतींतून त्यांनी भूमिका साकारल्या.
नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही काम केले आहे.
गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी बरीच वर्षं नाट्यसेवा केली होती. ‘द गोवा हिंदू असोसिएशन’ला सुखटणकर यांच्या आजवरच्या नाट्यप्रवासात मोठं स्थान होतं. या संस्थेमध्ये कलाकार म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांना कार्यकर्त्याच्या भूमिकेत जात नाट्यक्षेत्रासाठी भरीव योगदान दिलं आहे.
मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. त्यांची आईही स्वतंत्र विचारांची होती.
मोहनदास सुखटणकर यांचे बालपण गोव्यात गेले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले.
या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली. पन्नासहून अधिक वर्ष नाट्यक्षेत्राची सेवा केल्याबद्दल मुंबईच्या आम्ही गोवेंकर या संस्थेकडून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या विविध कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत अखंड सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.
मोहनदास सुखटणकर यांच्या निधनाने निष्ठेने रंगभूमीची सेवा करणारा ज्येष्ठ रंगकर्मी गमावला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी नाट्यक्षेत्राची अव्याहतपणे सेवा केली आहे. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com