Sharad Pawar appeals to both the ruling and opposition parties to stop slandering each other and try to take the state forward in terms of development.
सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही एकमेकांना दूषणं देण्याचं थांबवून राज्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याचं शरद पवार यांचं आवाहन
पुणे: सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही बाजूंनी एकमेकांना दूषणं देणं थांबवून राज्यातील वातावरण सुधारून विकासाच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गुजरातमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल पत्रकारांशी बोलत होते.
तळेगावला येऊ घातलेला वेदान्ता प्रकल्प राज्याबाहेर जायला नको होता, याबाबत चर्चाही झाली होती. राज्य सरकारनंही आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती. मात्र त्यानंतर यात बदल झाला आणि हा प्रकल्प आता गुजरातला गेला.
यात आता काही बदल होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे त्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नसल्याचं पवार म्हणाले.
केंद्रातील सत्ता हातात असल्यास राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जातात, असे प्रकार घडत असतात. शिंदे-भाजप सरकारला राज्यात प्रकल्पाची गरज वाटत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
पवार म्हणाले, कंपनीला आपली कंपनी कुठे चालवायची हा त्यांचा अधिकार आहे. यापूर्वी सुद्धा अशाप्रकारे कंपनीने भूमिका घेतली असून त्यात नवीन काही वाटत नाही. आमच्या काळात एन्रॉन प्रकल्पास विरोध झाला आणि राज्य सरकारला तो प्रकल्प गुंडाळावा लागला होता. नवीन सरकार राज्यात आले परंतु त्याचा कारभार दिसून आला नाही.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com