NCP President Sharad Pawar criticized that the Narendra Modi government at the center is acting against democracy
केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार लोकशाहीला मारक कृती करत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका
शिर्डी : संविधानाची शपथ घेऊन सत्तेत आलेलं केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार प्रत्यक्ष काम करताना मात्र राज्या-राज्यात भेदाभेद करुन महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवून नेत आहे, राज्यातलं सरकार पाडून लोकशाहीला मारक कृती करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
ते आज अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं आयोजित, पक्षाच्या दोन दिवसीय “राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा” या शिबिराचा समारोप करताना बोलत होते. घटनात्मक पदावर काम करताना अशा गोष्टी शोभत नाहीत, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन दिवसीय शिबिरातून झालेल्या चिंतन आणि मंथनातून पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळणार असून त्याचा उपयोग पक्षाच्या मजबुतीसाठी होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी तीन चार मिनिटं भाषण केलं. त्यानंतर त्यांच्या वतीनं दिलीप वळसे पाटील यांनी भाषण वाचून दाखवलं. या शिबिरात काल विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे आदी प्रमुख नेत्यांनी राज्यभरातून शिबिराला आलेल्या दोन हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘यूपीए, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रामाला विसरले म्हणून हरले’ या विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. त्या म्हणाल्या, ‘आपण रामाला कधीच विसरलो नाही. राम हा आपल्या मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. राम-कृष्ण हरी म्हटल्याशिवाय राज्यात कोणाचीही सकाळ सुरू होत नाही. त्यामुळे काही मुद्दा नाही म्हणून विरोधक राम विसरले असे बोलत असतील’.
सर्वांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. राज्यात घटनाबाह्य पद्घतीनं सत्तेवर आलेल्या सरकारला घालवून पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणातून केलं.
पक्षाचा विचार आणि केलेली कामं पदाधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत पोचवून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागावं, असं आवाहन केलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com