Sharad Pawar is confident that even after the political developments in the state, he will find a way out of this difficult situation
राज्यातल्या राजकीय घडामोडीनंतरही या कठिण प्रसंगातून मार्ग निघणार असल्याचा शरद पवार यांना विश्वास
नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यापूर्वीही भाजपानं असाच प्रयत्न केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना हरयाणात ठेवलं होतं. पण नंतर सरकार बनलं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातल्या घडामोडीवर दिली.
गेल्या अडीच वर्षात सरकार उलथवून टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण सरकार पडलं नाही. यावेळीही या या प्रसंगातून मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणं हा सर्वस्वी शिवसेनाचा अंतर्गत प्रश्न आहे, कारण महाविकास आघाडी सरकार बनण्याआधी संख्याबळानुसार शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असं एकमतानं ठरलं होतं, असंही पवार म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटींग बाबत ते म्हणाले की क्रॉस वोटींग होणं नवीन गोष्ट नाही. या आधीही क्रॉस वोटींग झालं आहे. पण त्यामुळे सरकार अडचणीत आलं नाही. वैयक्तिक संबंध वापरून मत आपल्याकडे वळवण्याचा प्रत्येक उमेदवार प्रयत्न करतो, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेची अंतर्गत बैठक झाली की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलू, असंही ते म्हणाले. दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते कमलनाथ यांना निरिक्षक म्हणून राज्यात जाण्याची सुचना केली आहे.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com