Sharad Pawar will reconsider the decision to leave the post of President
अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर शरद पवार फेरविचार करणार
निवडणुका न लढवण्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाध्यक्ष पद सोडण्याच्या मुद्द्यावर २-३ दिवसात शरद पवार करणार फेरविचार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाध्यक्ष पद सोडण्यासंदर्भात तसंच आगामी काळात कोणत्याही निवडणुकीला उभं न राहण्याच्या निर्णयावर २-३ दिवसात फेरविचार करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे निर्णय जाहीर केले होते. मात्र नेते आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला.
अनेक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलं. काही जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले. या निर्णयामुळं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाले होते. शरद पवार यांनी परस्पर असा निर्णय घेऊ नये असं सांगत जयंत पाटील यांना पवार यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.
त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुपारी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शरद पवार यांनी फेरविचार करण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कार्यकर्त्यांनी आंदोलन, उपोषण करु नये, पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ नये, असंही आवाहन शरद पवार यांनी केल्याचं ते म्हणाले. पक्षाचं कामकाज चालवण्यासाठी कार्याध्यक्ष हे पद निर्माण करण्याचा प्रस्ताव त्यांना दिलं असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.
शरद पवारांच्या घोषणेनंतर धाराशीव, बुलढाणा येथील पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले. मात्र, असं राजीनामे कुणीही देऊ नयेत. ते मंजूर केले जाणार नाहीत. पवार साहेबांना वाईट वाटेल अशी कुठलीही कृती करू नका. नवीन प्रश्न निर्माण करू नका, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं
पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असलो तरी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार असल्याचं पवार यांनी सकाळीच स्पष्ट केलं होतं. रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, वसंतदादा साखर इन्स्टिट्युट, यासारख्या संस्थांमध्ये कार्यरत राहणार असल्याचं ते म्हणाले होते.
शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असून राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथन सुरू आहे. त्यामुळं या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्यवेळी त्यावर बोलू, असं ते म्हणाले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com