Shinde group MLA left Goa for Mumbai on a special flight
शिंदे गटातले आमदार गोव्याहून विशेष विमानानं मुंबईला रवाना
पणजी (गोवा) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांच्या बंडखोर गटाचे गोव्यातील एका आलिशान हॉटेलमधून मुंबईकडे रवाना झाले.
गुवाहाटी, आसाम येथून आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून महाराष्ट्राचे आमदार हॉटेलमध्ये तळ ठोकून होते.
उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनासाठी एकनाथ शिंदे गटातले आमदार आज संध्याकाळी गोव्याहून विशेष विमानानं मुंबईला रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासह उपस्थित होते.
उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात बहुमत प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे. भाजपाला १२० आणि आमच्याकडे ५० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळं हा बहुमत प्रस्ताव अवश्य जिंकू असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या सोबतच्या आमदारांना शिवसेनेच्या नेतृत्वाविषयी कोणताही व्यक्तिगत आकस नाही, असं त्यांनी आज स्पष्ट केलं. यापैकी कोणत्याही आमदाराला केंद्रीय यंत्रणेच्या कोणत्याही प्रकारच्या नोटीसा आल्या नव्हत्या आणि त्या दबावापायी त्यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं असं झालेलं नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना अनेक दिवस या आमदारांमधे खदखदत होती. मुख्यमंत्री पदाच्या लालसेने कोणीही पक्ष सोडलेला नाही, असं ते म्हणाले. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपल्याला अतीव आदर असून त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानं आपल्यालाही वाईट वाटलं, असं शिंदे म्हणाले.
हे ही वाचा
महाराष्ट्र विधानसभेचं २ दिवसीय विशेष अधिवेशन येत्या ३ आणि ४ जुलैला होणार
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com