Shiv Sena is aggressive against the rebels, Aditya Thackeray’s challenge to resign and get re-elected
बंडखोरांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्याचं आदित्य ठाकरे यांचं आव्हान
मुंबई : शिवसेनेनं आज बंडखोर आमदारांच्या विरोधात जाहीररित्या आक्रमक भूमिका घेतली. सर्व बंडखोरांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून जिंकून दाखवावं. एकालाही जिंकू देणार नाही, असं आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलं.
मुंबईत आयोजित मेळाव्यात ते शिवसैनिकांना संबोधित करत होते. विधानसभेत लवकरच विश्वासदर्शक ठरावावर मतदान होईल आणि आम्ही तो जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंडखोरांसमोर भाजपा किंवा प्रहारमध्ये विलीन होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अन्यथा त्यांची आमदारकी रद्द होईल. तसंच शिवसेनेचं पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंकडेच राहील, असा दावा त्यांनी केला.
बंडखोरांना शिवसेनेनं सर्वकाही दिलं. कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं इतर कुणालाही दिलं नव्हतं. पण उद्धव ठाकरेंनी ते दिलं, असं एकनाथ शिंदे यांचा उल्लेख न करता ते म्हणाले. इतर आमदारांना केलेल्या मदतीचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचं घर आणि कार्यालयाच्या बाहेर केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. यावरही त्यांनी टीका केली. ही सुरक्षा काश्मिरी पंडित किंवा आसामातल्या पूरग्रस्तांना द्यायला हवी होती, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मुंबईत सामना कार्यालयापासून शिवसेना कार्यालयापर्यंत शिवसैनिकांनी बाईक रॅली काढली. यावेळी बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आलं.
दहीसरमध्ये शिवसेनेतर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली.
विरोधकांना शिवसेनेला तोडायचं आहे. पण बंड शिवसेनेला नवं नाही. काही लोकांनी संपत्ती जमवून पाठीत खंजीर खुपसला, असं ते म्हणाले. महाराष्ट्राला ३ भागात तोडायचं आहे, असा आरोप त्यांनी केला.
नाशिकमध्येही शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली तसेच शोकसभा घेण्यात आली. त्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील फुटीर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे तयार करून जोडे मारा आंदोलन करण्यात आले. त्यानंतर फुटीर आमदारांच्या विरोधात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तर नाशिक अमरधाम जवळ शोकसभेत मोर्चाचे रूपांतर झाले यावेळी गद्दार आमदारांना धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com