Shiv Sena leader Eknath Shinde arrives in Surat along with 29 other MLAs of the party
शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या इतर २९ आमदारांसह सुरतमधे दाखल
सुरत: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात नाहीत. या पार्श्वभूमीवर सर्व शिवसेना नेते आणि आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बोलावलं आहे. त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, सत्तेसाठी प्रतारणा करणार नसल्याचं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही विचारांची प्रतारणा केली नाही, आणि करणार नाही, असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
राजकीय नेतृत्वाच्या संपर्कातले शिवसेनेचे नेते २९ विद्यमान आमदारांसह गुजरातमधल्या सुरतमधे मेरिडियन हॉटेलमध्ये आहे. या संपर्कात नसलेल्या आमदारांमधे रायगडच्या तीन आमदारांचा समावेश आहे. गुजरातमधले भाजपा प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी या सगळ्यांची ला-मेरिडियनमधे जाऊन भेट घेतल्याचं वृत्त आहे.
जळगाव जामोदचे भाजपाचे आमदार संजय कुटे याठिकाणी पोहोचले आहेत. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सुरतेतल्या सिव्हिल हॉस्पिटलमधे दाखल केलं आहे. या सगळ्या आमदारांना अहमदाबादजवळ सनद इथल्या हॉटेलमधे हलवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, या घडामोडींवर काँग्रेस प्रभारी एच के पाटील काँग्रेस आमदारांबरोबर आज संध्याकाळी बैठक घेणार आहेत, तसंच शक्य असेल तर महाविकास आघाडीचीही बैठक होईल, अशी माहिती महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com