Short Term Business Training Courses in Aundh ITI from 15th November
औंध आयटीआयमध्ये १५ नोव्हेंबरपासून अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम
विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम
पुणे : औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील महिला व युवक तसेच ‘सारथी’ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे येत्या १५ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे.
कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक समाजातील तसेच ‘सारथी’ अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत असे बेरोजगार युवक, युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.
सुरुवातीला अल्पसंख्यांक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४, फील्ड टेक्निशियन- एसी, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सारथी अंतर्गत लाभार्थ्यांसाठी सध्या फक्त सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे, शिक्षण किमान इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण असावे. या अभ्यासक्रमांसाठी मुलींना प्राधान्य असून प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० आहे. किमान तीन महिन्याचा हा अभ्यासक्रम असणार आहे. प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका, टीसी, आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे तसेच दोन छायाचित्रे आवश्यक आहेत. इच्छुकांनी प्रवेशासाठी https://forms.gle/m7jZocco3RFcmBav5 या लिंकचा उपयोग करावा.
अधिक माहितीसाठी सुनिल तुपलोंढे (भ्रमणध्वनी क्र. – ९८५०१५१८२५) तसेच रविंद्र रापतवार (भ्रमणध्वनी क्र. -९४२१७६६४५६) यांच्याशी संपर्क साधावा. या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन उमेदवारांनी कौशल्यवृद्धी करावी, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com