Solar panels should be installed on the roofs of government offices
शासकीय कार्यालयांच्या छतावर सौर पॅनेल बसवावेत
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विकासकामांचा आढावा
विकासकामे वेगाने मार्गी लावू; निधीची अजिबात कमतरता नाही –पालकमंत्री
पुणे : जिल्ह्यातील विकासकामे वेगाने मार्गी लावायची असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासकीय निधीसोबतच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही सहकार्य घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मंजूर निधी वेळेत खर्च होईल याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने लंपी आजार नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. शिरूर परिसरात बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीती असल्याने बिबट्या पकडण्यासाठी अधिकचे पिंजरे लावावेत आणि तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक नियोजन करावे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी निवडक स्थळ घेऊन तेथील विकासाचे नियोजन करावे, जेणेकरून अशा ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकेल. आगामी काळातील रोजगार कौशल्याधारित असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात यावा. त्यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
शासकीय कार्यालयांच्या छतावर सौर पॅनेल बसवावेत
शासकीय कार्यालयांचा वीजेचा खर्च वाचवण्यासाठी आवश्यक वीज सौरऊर्जेवर निर्मित करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या छतावर सौरऊर्जा पॅनेल बसवण्याचा उपक्रम हाती घ्यावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते समाज कल्याण विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या सेवा पंधरवडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
अग्रणी बँकेतर्फे बँक मित्र नेमणूक पत्राचे वितरण
अग्रणी बँकेतर्फे जिल्हा परिषदेकडून कामे करण्याचा ठेका मिळालेल्या कंत्राटदारांना कर्ज मंजुरीचे पत्र पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले.
गाव पातळीवर बँकिंगच्या प्राथमिक सेवा पुरविण्याचे काम बँक मित्र यांचेमार्फत केले जात आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात अशा बँक मित्र महिलांना बँक ऑफ महाराष्ट्र कडून नेमणूक पत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा सादर केला. विविध विभागांच्या खातेप्रमुखांनीही आपापल्या विभागांची माहिती सादर केली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी आज सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सर्व व्यापारी बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा रविवारीही त्यासाठी सुरू राहणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com