Solar Power Project Training Course for Disabled Soldiers
दिव्यांग सैनिकांसाठी सौर उर्जा प्रकल्प प्रशिक्षण अभ्यासक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राकडून अभ्यासक्रमाची निर्मिती
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राद्वारे क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या सेवांतर्गत दिव्यांग सैनिकांसाठी सौर उर्जा प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम तीन महिने मुदतीचा असून त्याअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे तसेच त्याची देखभाल व दुरूस्ती करणे याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नामांकित कंपन्या हे प्रशिक्षण देणार आहेत.
क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे कौशल्य विकास केंद्रातर्फे नुकताच या अभ्यासक्रमाचा एका औपचारिक कार्यक्रमाद्वारे शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. राधाकृष्ण पंडित, क्वीन मेरी टेक्निकल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिष्ठाता कर्नल वसंत बल्लेवार, क्लीनमॅक्स एनर्जी एन्विरो कंपनीचे आंतरराष्ट्रीय प्रमुख धनंजय नांदेडकर, पनामा उद्योगसमूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल नलावडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अंजली जगताप-रामटेके , मधुसूदन शिंदे व सैनिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी डॅा. पंडित म्हणाले, “नवीकरणीय ऊर्जा ही काळाची गरज असून त्यामध्ये नोकरी व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाचा सैनिक बांधवांना आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने नक्कीच उपयोग होईल. तसेच या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकी शिक्षणावर भर न देता कार्यक्रमाचे स्वरूप व्वसायाभिमुख असून प्रात्यक्षिक कार्यावर जास्त भर असेल. या केंद्राद्वारे बायोएनर्जीवर आधारित कार्यक्रमदेखील आगामी काळात राबवला जाईल.”
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे आणि प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांचे त्यासाठी सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com