Startup week from tomorrow to boost innovation among youth – Information from Skill Development Minister Mangal Prabhat Lodha
तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी उद्यापासून स्टार्टअप सप्ताह – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी, १५ लाखांचे कार्यादेश मिळणार
मुंबई : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत दि.१० ते १२ ऑक्टोबरदरम्यान स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अशा विविध उपक्रमांमधून राज्यात स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सप्ताहासाठी देशभरातून हजारहून अधिक स्टार्टअप्सनी अर्ज केले होते. त्यातील निवडक 100 स्टार्टअप्सना तज्ञ, उद्योजक आणि अधिकाऱ्यांसमोर उद्यापासून ऑनलाइन सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागात काम करण्याची संधी मिळणार असून त्यासाठी या स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. विजेत्यांना येत्या १७ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
स्टार्टअप्सच्या माध्यमातून शासनामध्ये नवनवीन संकल्पना – मनीषा वर्मा
विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की, शासनाच्या विविध विभागात नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञान यांचा अवलंब करण्यासाठी स्टार्टअप सप्ताहाचा व्यापक उपयोग होतो. स्टार्टअप्सच्या नवनवीन संकल्पनांमुळे शासन आणि प्रशासनात नाविन्यता येण्यास मदत होते. देशभरातील कल्पक युवक हे शासनाच्या विविध सेवा, अभियान तथा योजनांमध्ये कल्पक बदल आणण्यासाठी स्टार्टअप्स सादर करतात. या उपक्रमातून कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इत्यादी), स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना शासनाच्या विविध विभागात काम करण्यासाठी कार्यादेश देण्यात येतील. या स्टार्टअप सप्ताहाच्या माध्यमातून युवकांमधील नवसंकल्पनांना चालना मिळण्याबरोबरच शासनामध्येही विविध कल्पक प्रयोग राबविता येतील, असे त्यांनी सांगितले.
देशभरातून १ हजार १०० अर्ज
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत या सप्ताहाचे नियोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन. म्हणाले की, महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. स्टार्टअप्सचे नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे हे स्टार्टअप सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आजपर्यंत ४ वेळा यशस्वीपणे संपन्न झाला असून विजेत्या ९६ (२४ विजेते प्रत्येक वर्षी) स्टार्टअप्सनी विविध शासकीय संस्था, विभागांसोबत काम पूर्ण केले आहे. पाचव्या आवृत्तीकरिता देशभरातून अर्ज केलेल्या १ हजार १०० स्टार्टअप्सपैकी अव्वल १०० स्टार्टअप्सच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. अंतिमतः विजेत्या २४ स्टार्टअप्सला प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यालयीन आदेश (वर्कऑर्डर्स) देण्यात येणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com