State Excise Department will strengthen the investigative system – Minister Shambhuraj Desai
राज्य उत्पादन शुल्क विभागात तपास यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : राज्यात तयार होणाऱ्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक व विक्रीस पायबंद बसावा, तसेच परराज्यातून होणारी अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची तपास यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभागात केंद्रीकृत सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, वाहनांना डिजिटल लॉकिंग यंत्रणा तसेच बांधण्यात येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारत बांधकाम आराखडा याबाबत मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, मद्यनिर्मिती ते मद्यविक्री या टप्प्यामध्ये वाहनांना डिजिटल लॉकिंग यंत्रणा असल्यास अवैध वाहतुकीस आळा बसेल. केंद्रीकृत सीसीटीव्ही यंत्रणेमुळे जिल्हा स्तरावरील यंत्रणा अधिक कार्यक्षम होतील तसेच विभागाच्या क्षेत्रीय इमारतीचा आराखडा सर्व ठिकाणी सारखा ठेवावा, अशा सूचनाही यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
या बैठकीत केंद्रीकृत सीसीटीव्ही यंत्रणा व डिजिटल लॉकिंग प्रस्ताव याबाबत सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्कचे उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com