More than Rs 8,000 crore to states to strengthen fire services
अग्निशमन सेवा मजबूत करण्यासाठी राज्यांना ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी
शहरी भागात पूरस्थिती प्रभावीरित्या हाताळण्यासाठी, तसंच अग्निशमन सेवा मजबूत करण्यासाठी राज्यांना ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा
आपत्तींचा मोठा धोका असलेल्या साडेतीनशे जिल्ह्यांमधे सुमारे १ लाख तरुण स्वयंसेवक तयार करण्याचं उद्दिष्ट
नवी दिल्ली: शहरी भागात पूरस्थिती प्रभावीरित्या हाताळण्यासाठी, तसंच अग्निशमन सेवा आणि भूस्खलनाच्या आपत्तीत काम करणारी यंत्रणा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी पुरवेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. ते नवी दिल्ली इथं, देशात आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आयोजित राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.
अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी ५ हजार कोटी रुपये, तर मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, हैद्राबाद आणि अहमदाबाद या सात महानगरांच्या शहरी भागात पूराचा धोका कमी करण्यासाठी २ हजार ८०० कोटी रुपये दिले जातील, असं त्यांनी सांगितलं.
भू-स्खलनाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी १७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना ८२५ कोटी रुपये दिले जातील, असंही त्यांनी सांगितलं. आपत्तींची वारंवारता आणि स्वरुप बदललं असून, अशा आपत्तींपासून प्रत्येक जीव वाचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीनं गेल्या ९ वर्षात केंद्र सरकारनं लवकरच इशारा देणारी यंत्रणा, आपत्ती रोखणं, तिला तोंड देणं आणि सुसज्जतेवर आधारित आपत्ती व्यवस्थापनावर भर दिला आहे. आपत्तींचा मोठा धोका असलेल्या साडेतीनशे जिल्ह्यांमधे सुमारे १ लाख तरुण स्वयंसेवक तयार करण्याचं उद्दिष्ट मोदी सरकारनं ठेवलं आहे, असंही शाह यांनी सांगितलं.
दिवसभर चाललेल्या या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासह गृह मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com