Students should research the issues of society
विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रश्नांवर संशोधन करावे
-सीमेटचे महासंचालक डॉ.भरत काळे
विद्यापीठ स्तरावरील आविष्कार स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण
पुणे : दर दिवसाला जगात अनेक बदल होत आहेत, त्या अनुषंगाने सध्या सरकारही दर शंभर दिवसाचे नियोजन करत दर शंभर दिवसांनी याचा आढावा घेत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील या बदलत्या जगाचा आढावा घेत समाजाच्या प्रश्नांवर उत्तरे शोधणारे संशोधन करावे असे आवाहन सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी (सीमेट) चे महासंचालक डॉ.भरत काळे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आविष्कार या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेची विद्यापीठ पातळीवरील फेरी मंगळवार दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ.भरत काळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता व सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले, माजी कुलगुरू डॉ.आर.एस. माळी, काकासाहेब मोहिते, रविंद्र जायभाये, प्रा.मोहन वामन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ.काळे म्हणाले, आपल्याकडे अनेक मोठे प्रश्न आहेत ज्यामध्ये ई वेस्ट, पडीक जमीन सुपीक करणे, शेतीविषयक, तंत्रज्ञान अशा अनेक बाबींवर संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधन हे केवळ भर घालणारे नाही तर नव्याने काही गोष्टी निर्माण करणारे असावे.
डॉ.सोनवणे म्हणाले, आपल्या अवतीभोवतीचे जग समजून घेतले घेत प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला की त्यातूनच नव्या कल्पना शोधता येतात. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान नाही तर मानवता हे देखील संशोधनाचे खूप मोठे क्षेत्र आहे. मानवी वर्तन आणि वृत्तींचा अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे. तुम्हा विद्यार्थ्यांमधून आम्हाला उद्याचे संशोधक मिळतील यात शंका नाही.
डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा जिंकणे इथपर्यंत मर्यादित न राहता प्रकल्पाचे संशोधनात रुपांतर करावे, स्वामित्व हक्क घ्यावे आणि त्याचे स्टार्ट प मध्ये रुपांतर करावे आणि त्यातून नवउद्योजक बनावे. नव्या शैक्षणिक धोरणात कोणत्या क्षेत्रात संशोधन व्हावे याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत याचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा.
प्रा.काकासाहेब मोहिते यांनी आविष्कार स्पर्धेची मूलभूत माहिती देत संशोधन हे समाजोपयोगी असण्यासोबतच ते नवउपक्रमशील असावे असे सांगितले.
डॉ.संजय ढोले यांनी यावेळी स्पर्धेविषयी माहिती सांगितली. ते म्हणाले, शेती, पशू संवर्धन, वैद्यक आणि औषधशास्त्र, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, मानवता आणि भाषा या क्षेत्रातील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले जाते. पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधक या तीन स्तरावर ही स्पर्धा होते .
ही स्पर्धा सुरुवातीला महाविद्यालय पातळीवर झाली ज्यात चार हजार विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यातून विभागीय स्तरावर स्पर्धा झाली त्यातून २३३ प्रकल्प निवण्यात आले तर आता विद्यापीठ स्तरावर जी स्पर्धा पार पडत आहे त्यातून ४८ प्रकल्पांची निवड केली जाणार असून हे राज्य पातळीवरील विद्यापीठ स्तरावर विद्यापीठाच्या वतीने सादरीकरण करतील.
यंदा या स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. तर १४ पैकी नऊ वर्ष विजेतेपद आपल्या विद्यापीठाला मिळाले आहे. यंदाही हे विजेतेपद आपल्याकडेच येईल असा विश्वास देखील डॉ.ढोले यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मोहन वामन यांनी केले तर आभार प्रा.रविंद्र जायभये यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com