Superintending Engineer J.D.Kulkarni honored with Outstanding Engineer Award
अधिक्षक अभियंता जे.डी.कुलकर्णी उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत धोंडोपंत उर्फ जे.डी. कुलकर्णी यांना नुकतेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे सपत्नीक सन्मानित करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दरवर्षी उल्लेखनीय कार्याबद्दल विविध स्तरावरील तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार दिला जातो. सन २०१८ सालच्या ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कारासाठी श्री कुलकर्णी यांची निवड झाली होती.
उल्लेखनीय कामे
श्री कुलकर्णी यांची १९८९ साली सहायक अभियंता श्रेणी-१ या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली . त्यांनी कार्यकारी अभियंता पदी लातूर, अकोला, पुणे व अहमदनगर येथे सेवा केली असून रत्नागिरी येथेही ते अधीक्षक अभियंता होते.
या सर्व काळात त्यांनी औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील उड्डाणपुलामध्ये मराठवाडयात प्रथमच Reinforced Earth work या नविन तंत्रज्ञानाद्वारे पोचमार्गाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले. तसेच औरंगाबाद येथील पहिली विभागीय ग्रंथालय इमारत वैशिष्टपूर्ण बांधकामासह पूर्ण केली.
राजभवन मुंबई येथील कर्मचारी वसाहतीतील १५ मजली इमारत नियोजित वेळेत पूर्ण केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला उभारणीत वैशिष्टपूर्ण वसतीगृह व इमारत बांधकाम पूर्ण केले.
२६ जुलै २००५ मधील मुंबई- कोकणातील जलप्रलयानंतर रायगड जिल्हयातील दासगाव, जुई कोंडवते गावाचे पुनर्वसन तात्काळ पूर्ण केले. रस्ते विशेष अनुशेष कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्हयात त्यांच्या कार्यकाळात शंभराच्या जवळपास खेडी रस्त्याने जोडण्यात आली.
पुणे येथे कार्यरत असताना राजभवन इमारतीचे सुशोभिकरण, विधानमंडळ इमारतीचे नियोजन यासह इतर इमारतीचे बांधकामात महत्वाचा सहभाग अशी विविध उल्लेखनीय कामे केली.
उत्तम प्रशासकीय अधिकारी आणि पारदर्शक कारभारासाठी जे. डी. कुलकर्णी सर्वांना परिचित आहेत. आशियाई विकास बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या रस्ते सुधारणा प्रकल्पामध्ये समन्वय अधिकारी म्हणून ते काम पाहत आहेत. यापूर्वी शासनाची धोरणे ठरवणाऱ्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे.
महाराष्ट्र शासनाचा वैयक्तिक पुरस्कार जाहीर मिळाल्याबद्दल चंपावती चॅम्पीयन ग्रुप सार्वजनिक बांधकाम विभाग अन्य शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी जे.डी. कुलकर्णी यांचे अभिनंदन करुन पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com