‘Svadha’- Wellness Wear Collection in Khadi
‘स्वधा’- खादीमधील वस्त्रप्रावरणांची वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी
नवी दिल्ली : भारत 21 जून 2022 रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात योग कशाप्रकारे उपयुक्त ठरला, हे पुन्हा ठामपणे प्रतिपादित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी ‘मानवतेसाठी योग’ ही संकल्पना जाहीर केली आहे.
कोविडनंतरच्या भू-राजनैतिक संकटाच्या काळात परस्परांविषयी दया आणि करुणा याद्वारे योग लोकांना एकत्र आणेल आणि जगभरात एकात्मतेची भावना वाढीस लागेल, असे पंतप्रधानांना ठामपणे वाटते.
भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाची निरनिराळी खादी उत्पादने प्रभावीपणे निर्माण करणे, त्यांचे उत्पादन करणे आणि त्यांचे विपणन करणे या कार्यात खादी संस्थांना मदत करण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या(MSME)खादी ग्रामोद्योग मंडळाने(KVIC),नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) येथे सेंटर फॉर एक्सेलन्स या खादी केंद्रांची (CoEK) स्थापना केली आहे.
सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादी या केंद्राने (COEK) ‘खादी स्पिरीट’ -म्हणजे “पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्यासोबत सह-संवेदना” अशी संकल्पना पुढे आणत हीच भावना आपल्या केंद्राच्या माध्यमातून अधोरेखित करत पुढे आणली आहे.
संतुलन हे योगाचे मर्म आहे – केवळ शरीरांतर्गत संतुलन किंवा फक्त मन आणि शरीरातील संतुलनच नव्हे तर जगासोबत मानवी नातेसंबंधातील संतुलन हे देखील आहे.
योगाची ही मूळ विचारधारा लक्षात घेऊन,सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादी या केंद्रामधील डिझाइन चमूने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खादीचे अष्टपैलुत्व दाखवण्यासाठी ‘वेलनेस वेअर’याअंतर्गत वस्त्रप्रावरणांची ‘स्वधा’नावाची नवीन श्रेणी निर्माण केली आहे. अथर्ववेदात ‘स्वधा’ म्हणजे सहजता, आराम किंवा आनंद, जे खरोखरच या वस्त्रसंग्रहाचे गुणधर्म आहेत.
या वस्त्रसंग्रहातील वस्त्रप्रावरणे योग अभ्यासकांना आणि योगप्रेमींना वापरुन पहाण्यासाठी आणि त्यांचा अभिप्राय मागविण्यासाठी दाखविण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्या, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या आणि पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल किरण बेदी,यांनी या वस्त्रप्रावरणांच्या संकलनाला मान्यता मिळवून देण्यासाठी आणि डिझाइनरशी संवाद साधण्यासाठी निफ्ट येथील येथील केंद्राला भेट दिली.
पर्यावरणवादी रिपू दमन बेवली यांनी स्वधा या वस्त्रप्रावरणसंग्रहामधील वस्त्रे परीधान केली आणि खादीच्या कापडाने मिळणाऱ्या आरामाची प्रशंसा केली ज्यामुळे योगासने किंवा व्यायाम करणे सोपे होते.
‘स्वधा’ श्रेणीतील ही वस्त्रप्रावरणे सजगता आणि चिकाटी या मूल्यांवर भर देत असून सर्व वयोगटांना आकर्षित करण्याचा या वस्त्रसंग्रहाचा उद्देश आहे.या वेलनेस वेअरमध्ये नैसर्गिक रंगछटांमधील हाताने सूत कातून बनविलेल्या खादीचा वापर केलेला आहे. अशाप्रकारे खादीचा हा धागा खर्या अर्थाने जागतिक स्तरावर लोकांना ‘वसुधैव कुटुंबकम्’ – असे सांगत जग हे एकच कुटुंब आहे या भावनेने गुंफून टाकत आहे.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com