Swarajya Mahotsav organized by Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्वराज्य महोत्सवाचे आयोजन
‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमांतर्गत दीड लाख सेल्फी काढत गिनीज विश्वविक्रम नोंदविणार
पुणे : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘ आझादी का अमृतमहोत्सव’ देशभर साजरा केला जात आहे. त्याच धर्तीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा आयोजन करण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने एक लाख राष्ट्रध्वजांचे वितरण पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीन हजार प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
१५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वजाच्या साहाय्याने तिन्ही जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक यांच्या सहभागातून ॲपच्या माध्यमातून दीड लाख ध्वजारोहणाचे सेल्फी संकलित करून गिनिजद्वारे जागतिक विश्वविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ.देसाई यांनी सांगितले.
याबाबतची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ.संजय चाकणे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर यासाठी अधिसभा सदस्य संतोष ढोरे, हनुमंत खांदवे पाटील यांनीही हजेरी लावली होती. या सभेसाठी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com