Swearing in of 18 new Cabinet Ministers in an expansion of the State Cabinet
३९ दिवसानंतर आज मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त
राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात १८ नव्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी
मुंबई : मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आज झाला. राजभवनातल्या दरबार हॉलमधे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी १८ नव्या कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी समारंभाला विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते.
आजच्या मंत्रीमडळ विस्तारात, शिंदे गटाच्या ९, तर भाजपाच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण, अतुल सावे आणि मंगलप्रभात लोढा यांना स्थान मिळालं आहे.
तर शिंदे गटात गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दिपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांना मंत्री पद मिळालं आहे.
दरम्यान, संजय राठोड यांच्या समावेशावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देणं दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं. यावर ज्यांना क्लीन चिट मिळाली आहे त्यांनाच मंत्रीमंडळात स्थान दिलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबद्दल शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, राज्यातल्या स्त्री शक्तीवर हा अन्याय असल्याचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
उशीरा का होईना एकदाचा शपथविधी झाला. महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं आता लवकरात लवकर राज्यातील प्रश्न सोडवावेत. खुप समस्या आहेत ते सोडवावेत. मात्र ज्यांच्याबद्दल अद्याप बोललं जात आहे, ज्यांना अद्याप क्लीनचिट मिळालेली नाही, अशांना मंत्रिमंडळात घेतलं, मात्र ते टाळता आलं असतं तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. एका ट्विटमध्ये, श्री मोदी म्हणाले की, ही टीम प्रशासकीय अनुभव आणि चांगले प्रशासन देण्याची उत्कटता यांचे उत्तम मिश्रण आहे. राज्यातील जनतेच्या सेवेसाठी त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली. या सोहळ्याला नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com