Tax exemption for residential properties in Pune Municipal Corporation remains
पुणे महापालिकेतील निवासी मालमत्तांची कर सवलत कायम
मुंबई : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली अनेक वर्षांपासुनची मागणी लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी पुढाकार घेऊन मार्च 2023 मध्ये अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आयोजित करण्यात आली होती.
पुणे महानगरपालिका हद्दीतील निवासी मालमत्तांना दिलेली मालमत्ता कराची सवलत कायम ठेवण्याचा तसेच दुरूस्ती व देखभाली पोटीच्या फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे निवासी मिळकतींना देण्यात आलेली 40 टक्के सवलत कायम राहील. तसेच देखभाल दुरूस्तीपोटी देण्यात आलेली 5 टक्के रक्कम देखील वसूल करण्यात येणार नाही. घर मालक स्वतः राहत असल्यास, वाजवी भाडे 60 टक्के धरून देण्यात येणारी 40 टक्के सवलत ही 1970 सालापासून देण्यात येत असून, ती कायम राहील.
पुढील कॅबिनेटच्या बैठकीत यावर प्रस्ताव आणून मान्यता देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून 10 टक्के ऐवजी 15 टक्के सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षिक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करतांना 40 टक्के सवलत देण्यास शासनाने मान्यता दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com