Only 25 candidates will sit in a class during the 10th-12th examination
१०वी – १२वीच्या परीक्षेदरम्यान एका वर्गात केवळ २५ परीक्षार्थी बसणार
मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने आधीच तयारी सुरू केली. करोनानंतर नियमित परीक्षा होत असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून चाचपणी करण्यात आली.
यंदा परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. ज्यादाचा वेळ मिळणार नाही. करोनापूर्वी जशा परीक्षा होत होत्या तशाच परीक्षा होणार आहेत.
शाळा तेथे परीक्षा केंद्र नसणार. त्यामुळे परीक्षेची व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मंडळाची तयारी चालू आहे . शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, परीक्षार्थींची संख्या, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सोयीसुविधांबाबतचा आढावा विभागीय पातळीवर निश्चित करण्यात आला.
यंदा दहावी, बारावीचे सुमारे वीस नवीन परीक्षा केंद्र वाढू शकतात, असे सांगण्यात येत आहे. दहावीसाठी विभागात पाच जिल्ह्यांत साडेसहाशेपेक्षा अधिक, तर बारावीचे पावणेचारशेपर्यंत परीक्षा केंद्र संख्या असतील असे सांगण्यात येते. जिल्हानिहाय बैठकांमधून परीक्षा केंद्रांचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी एका वर्गात २५ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था ठेवण्याची सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. या परीक्षेचं वेळापत्रक निश्चित झालं असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार आहे.
राज्यभरातील आठ हजार केंद्रांवर सुमारे ३० लाख विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके नेमली जाणार असून, विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असं आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com