The 10th Dhammasakcha International Student Conference was concluded by the Department of Pali and Buddhist Studies of the University
विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे दहावी धम्मसाकच्छा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद संपन्न
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे दि. ४ मार्च २०२३ रोजी धम्मसाकच्छा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थी परिषदेचे हे यंदाचे दहावे वर्ष होते.
बौद्ध धर्माची आंतरविद्याशाखीय भूमिका ही या वर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. यावर्षीच्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन मुंबई येथील टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संचालक प्रा. जयराम चेंगलूर यांनी केले. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सिगालोवादसुत्त, महापरिनिब्बानसुत्त आदींची उदाहरणे देत बौद्ध धर्माची आजच्या काळातील प्रासंगिकता विशद केली.
बीजभाषण मुंबई येथील टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसचे सहयोगी प्राध्यापक डॉ. एस्. आर्. बोधि यांनी केले. त्यांनी बौद्ध धर्माच्या सामाजिक संदर्भांचा परामर्श घेतला, तसेच बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करताना आपण त्यांचा संदर्भ लक्षात घेऊन अभ्यास केला पाहिजे असे देखील सांगितले.
विद्यार्थ्यांना विद्यार्थिदशेतच संशोधनाचे बाळकडू मिळावे या उद्देशाने विभागातर्फे २०१४ सालापासून ही परिषद आयोजित करण्यात येते. एम्. फिल्.-पीएच्. डी., एम्. ए. आणि प्रमाणपत्र-पदविका अशा तीन विभागांमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षीच्या विद्यार्थी परिषदेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाव्यतिरिक्त भारतातील अन्य आठ विद्यापीठे तसेच, चीन व बांगलादेशातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. एम्. फिल्.-पीएच्. डी. विभागात १७, एम्. ए विभागात २९ आणि प्रमाणपत्र-पदविका विभागात ०९ असे एकूण ५५ शोधनिबंध परिषदेत सादर केले गेले.
एम्. फिल्.-पीएच्. डी. विभागात चीनमधील मकाऊ विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान आणि धार्मिक अध्ययन विभागातील पीएच्. डी. ची विद्यार्थिनी प्रकृती मुखर्जी हिला प्रथम क्रमांकाचे तर गौतम बुद्ध विद्यापीठातील बौद्ध अध्ययन आणि संस्कृती प्रशाळेच्या ग्युयेन द्यूच्यौंग (भिक्खू मिन्ह न्हन) या व्हिएतनामी विद्यार्थ्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
एम्. ए. विभागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागातील ग्युयेन थि किम आन (भिक्खुणी पञ्ञालोका) आणि टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसचा युवराज सुरवडे या दोन विद्यार्थ्यांचे शोधनिबंध सर्वोत्तम ठरले.
प्रमाणपत्र-पदविका विभागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागातील डॉ. दीप्ती किरतकर यांनी प्रथम क्रमांकाचे तर सोमैय्या विद्याविहार विद्यापीठातील सुरभी अग्रवाल हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
या विद्यार्थी परिषदेच्या एम्. फिल्.-पीएच्. डी. विभागातील शोधनिबंधांचे परीक्षण मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र आणि राजकारण विभागातील निवृत्त प्राध्यापक डॉ. सुरेंद्र जोंधळे, टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संचालक प्रा. जयराम चेंगलूर आणि कलकत्ता विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख प्रा. उज्ज्वल कुमार यांनी केले.
एम्. ए. विभागातील शोधनिबंधांचे परीक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली-प्राकृत विभागाचे प्रमुख प्रा. नीरज बोधि, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत आणि प्राकृत भाषा विभागातील निवृत्त प्राध्यापिका डॉ. राजश्री मोहाडीकर, पुणे येथील कल्पवृक्ष संस्थेचे प्रकल्प समन्वयक मिलिंद वाणी, फ्लेम विद्यापीठ व अहमदाबाद विद्यापीठातील अभ्यागत प्राध्यापक हेमंत राजोपाध्ये यांनी केले.
प्रमाणपत्र-पदविका विभागातील शोधनिबंधांचे परीक्षण डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वविद्या विभागातील प्रा. श्रीकांत गणवीर आणि सोमैय्या विद्याविहार विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन केंद्रातील प्रा. गौतम मोरे यांनी केले.
परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी विभागप्रमुख प्रा. महेश देवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. परिषदेच्या संयोजिका प्रा. प्रणाली वायंगणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर सूत्रसंचालन विभागातील विद्यार्थी रवि रंजन याने केले. समारोपाच्या वेळी परीक्षकांनी परिषदेत वाचल्या गेलेल्या शोधानिबंधांविषयी आपली मते मांडली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिषदेच्या समन्वयिका प्रा. दीपाली पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. समारोपाचे सूत्रसंचालन विभागातील विद्यार्थी शाक्य विभोर मौर्य याने केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com