The competent in society should accept the guidance of at least two people
समाजातील सक्षमांनी किमान दोन लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारावे
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सर्वांनी एकाच दिशेने न जाता करीयरच्या विविध संधी निवडाव्यात
आपले भारतीय ज्ञान, मुल्ये परंपरा जतन करून पुढील पिढयांपर्यंत पोहोचविणे आपले कर्तव्य आहे
नवी दिल्ली : समाजातील सक्षमांनी किमान दोन लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारण्याचे आवाहन, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. येथील अशोक हॉटेलमध्ये आज ‘ब्रह्मोद्योग 2023’ परिषदेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, ब्राम्हण लोकांचे मार्गदर्शकत्व करीत असताना अन्य समाजातील दुर्बल घटकांमधून किमान एकाचे मार्गदर्शकत्व स्वीकारणे ही वसुधैव कुटुम्बकम् चे पाऊल असून ती आपली जीवन शैली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात केंद्रीय संसदीय राज्य मंत्री प्रल्हाद जोशी, विश्वप्रसन्न् तीर्थ महास्वामी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे डॉ. गोविंद कुलकर्णी, उद्योजक श्रीकांत बडवे, शेफ विष्णू मनोहर, विविध राज्यांतील खासदार आणि उद्योजक या परिषदेस उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, आपले भारतीय ज्ञान, मुल्ये परंपरा जतन करून पुढील पिढयांपर्यंत पोहोचविणे आपले कर्तव्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जागतिक स्तरावर मजबूत राष्ट्र बनविण्याच्या भारताच्या या प्रवासात प्रत्येकाने आपली भुमिका निभावून संधीचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे.
सर्वांनी एकाच दिशेने न जाता करीयरच्या विविध संधी निवडाव्यात. जगण्याचा दृष्टीकोण नेहमी व्यापक ठेवून विचार केल्यास, यश नक्कीच मिळेल. ब्रह्मोद्योगाच्या माध्यमातून भविष्यात हे शक्य होईल, असा विश्वास श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
कोविड महासाथीच्या काळात भारत एक सशक्त देश म्हणून जगापूढे आलेला आहे. जागतिक व्यापारात पूढे असणाऱ्यांच्या यादीत भारताचे स्थान अधिक वरचे होत आहे. आपल्या देशात प्रचंड क्षमता आहे. जगातील मोठे उद्योजक भारताकडे बघत आहेत. भारत उद्योग क्षेत्रात नवीन अध्याय सुरू करणार असून भविष्यात जगातील सर्वात मोठे कारखाने भारतात असतील, असे ही ते यावेळी म्हणाले.
तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासह आपल्या देशाची समृद्ध सांस्कृतिक पंरपरा यांच्या एकत्रिकरणाने भारत हा एक सशक्त देश बनत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात ब्राम्हण तरूण तरूणी पुढे असल्याचे नोंदवून, ही वाटचाल अशीच राहील अशा शुभेच्छा श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. व्यवसाय क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी उदयोगपती, व्यवसायिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
Hadapsar News
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com