Common entrance examination completed for admission to the competition examination centre through ‘Sarathi’
सारथीमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सपंन्न
विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत योग्य चौकशी करण्याची व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) २५० विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्येसवा) स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रवेश देण्याकरीता सामाईक प्रवेश परीक्षा १९ जून रोजी घेण्यात आली.
परीक्षेबाबत काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीसंबंधी तांत्रिक व प्रशासकीय चौकशी पूर्ण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.
सारथीच्यावतीने नियुक्त संस्थेमार्फत एमपीएससी-२०२३ करीता ‘सारथी एमपीएससी सीईटी २०२२’ पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद व अमरावती येथील २७ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली.
सर्व परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी ७ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ९९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी लोणी काळभोर येथील एका परीक्षा केंद्रावर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या.
एमआयटी व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी काळभोर पुणे या परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे, संगणकाची स्क्रीन वारंवार हँग होत असल्यामुळे त्याच दिवशी दुपारी या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली.
याबाबत काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीसंबंधी तांत्रिक व प्रशासकीय चौकशी पूर्ण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याबाबत काळजी घेऊनच योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com