The contribution of Ayurveda for centuries has made human life prosperous and healthy -Sarbanand Sonowal
शतकानुशतके आयुर्वेदाच्या योगदानामुळे मानवी जीवन समृद्ध आणि निरोगी -सर्वानंद सोनोवाल
मुंबई : मानवी जीवन समृद्ध आणि निरोगी करण्यासाठी पारंपरिक भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतींनी शतकानुशतकं योगदान दिलं आहे असं मत केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल व्यक्त केलं. नवी मुंबईत खारघर इथं आयुष संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते. प्रादेशिक होमिओपाथी संशोधन संस्था आणि प्रादेशिक युनानी औषध संशोधन संस्था अशा तीन मजली दोन इमारतींचा या संकुलामध्ये समावेश आहे.
आधुनिक औषधांसोबतच या दोन उपचार पद्धतींचे लाभ एकत्रितपणे मिळावेत अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती आणि त्या संकल्पनेनुसारच या संकुलाची निर्मिती केल्याचं ते म्हणाले. संशोधनासोबतच रुग्ण सल्ला, रोगनिदान, औषधोपयोजना, रक्ततपासणी, आणि जैवरसायन चाचण्या, अशा मुलभूत वैद्यकीय सुविधाही या संकुलात उपलब्ध असतील, असंही सोनोवाल यावेळी म्हणाले.
“पारंपरिक आणि अप्रचलित अशा वैद्यकीय पद्धतींचे लाभ आधुनिक चिकित्सापद्धतींसोबत एकत्रित करण्याच्या कल्पनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन दिले आहे.” असे ते म्हणाले. होमिओपॅथी प्रादेशिक संशोधन संस्थेला, ‘अॅलर्जीमुळे होणाऱ्या विकारांवर संशोधन संस्था’ म्हणून विकसित करण्याचा आयुष मंत्रालयाचा विचार आहे, तसेच, युनानी प्रादेशिक संशोधन संस्थेला, इलाज-बित-तदबीर म्हणजेच, जीवनशैलीत बदल घडवून सुदृढ शरीराठी दिल्या जाणाऱ्या उपचारांचे उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस असल्याचे सोनोवाल यांनी पुढे सांगितले.
“ह्या नव्या संकुलाचे उद्घाटन करत, आयुष मंत्रालयाने भारतीय पारंपारिक औषधी पद्धतींचा प्रचार आणि वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.” असे सोनोवाल म्हणाले. “मुंबई आणि महाराष्ट्रातल्या लोकांना या संस्थांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या यशाबद्दल बोलताना आयुष मंत्री म्हणाले की, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनी भारतात २२ कोटींहून अधिक लोकांनी योगासने केली. ‘योग शब्दाचा अर्थ ‘जोडणे’; आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी जगभरातील लोकांना जोडले आहे, असे त्यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com