The dairy industry provides livelihood to crores of people across the world – Prime Minister
दुग्ध व्यवसाय जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो – प्रधानमंत्री
2025 पर्यंत सर्व दुग्धजन्य प्राण्यांना पाय, तोंड रोग लसीकरण केले जाईल
नवी दिल्ली : दुग्ध व्यवसाय फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत नाही तर जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाॅयडा इथं सांगितलं. आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनचच्या शिखरपरिषदेचं उद्घाटन त्यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते.
विकसित देशांपेक्षा वेगळ्या असलेल्या भारतीय दुग्धव्यवसायाची ताकद छोटे शेतकरी आहेत, असं त्यांनी सांगितलं. भारताचा दुग्धव्यवसाय हा मोठ्या उत्पादनापेक्षा जनतेच्या उत्पादनासाठी ओळखला जातो, या पूर्ण साखळीत कोणी मध्यस्थ नाही आणि ग्राहकांकडून जो पैसा मिळतो त्यातला ७० टक्कयाहून जास्त शेतकऱ्यांच्या खिशातच जातो असं ते म्हणाले. आज भारतात दुग्धव्यवसायात जे मोठं सहकाराचं जाळं आहे त्याचं उदाहरण जगभरात सापडणं अवघड असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
या सहकार चळवळीमुळे २ लाखाहून अधिक गावातून सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांकडून दिवसातून दोन वेळा दूध गोळा केलं जातं आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं, अशी माहिती त्यांनी दिली. या व्यवसायात ७० टक्के महिला शक्ती आहे. या व्यवसायात महिलांचं प्राबल्य आहे.
भारतात 2014 मध्ये 146 मिलियन टन दूध उत्पादन घेतलं जात होतं ते आता 210 मिलियन टनापर्यंत पोचलं आहे. ही 44 टक्केची वाढ ही आमच्या सरकारने दुग्धव्यवसाय क्षेत्राचे सामर्थ्य वाढवण्यासाठी निरंतर काम केलं त्याचं फलित आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नदेखील वाढलं आहे. भारत दुग्धव्यवसायाचा सर्वात मोठा डेटाबेस तयार करत आहे. पशुआधार हा गुरांच्या बायोमेट्रीक ओळख नोंदवणारा प्रकल्प आकाराला येत आहे , असं त्यानी सांगितलं.
मोदी म्हणाले की, भारतात झालेली डिजिटल क्रांती डेअरी क्षेत्रातही पोहोचली आहे. ते म्हणाले, भारताच्या डेअरी क्षेत्रासाठी विकसित केलेली डिजिटल पेमेंट प्रणाली जगभरातील शेतकऱ्यांना मदत करू शकते.
पंतप्रधान म्हणाले, भारत डेअरी क्षेत्रातील उत्पादन वाढविण्यासाठी पशु-आधार या दुग्धजन्य प्राण्यांच्या बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतले आहे.
ते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये गुरांना चर्मरोगाचा धोका निर्माण झाला असून या आजारावर स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे, त्यांचे जीवन सुरक्षित आहे.
श्री मोदी म्हणाले, प्लास्टिक हे गुरांसाठी धोक्याचे बनले आहे आणि एकेरी वापराचे प्लास्टिक काढून टाकण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ते म्हणाले, 2025 पर्यंत सर्व दुग्धजन्य जनावरांना पाय व तोंडाच्या आजाराचे लसीकरण केले जाईल.
पोषण आणि उपजीविकेसाठी दुग्धव्यवसाय ही या चार दिवसीय परिषदेची संकल्पना आहे. ५० देशातले पंधराशे लोक या परिषदेत सहभागी होत आहेत.