The deadline to send entries for Maharashtra State Drama Competition is September 15 – Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर, २०२२ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १५ नोव्हेंबर, २०२२ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी १ जानेवारी २०२३ पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी १ जानेवारी २०२३ पासून १० केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी २०२३ मध्ये आयाजित करण्यात येणार आहे.
नाट्य स्पर्धेकरीता रु.३,०००/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष तर बालनाट्य स्पर्धेकरीता रु.१,०००/- इतक्या रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. १५ सप्टेंबर, २०२२ पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.
१) मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
२) पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे (7579085918) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
३) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-०२, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-431005 (08788893590) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
४) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.
राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.