The demand of 34 rebel MLAs to retain Eknath Shinde as party chief of Shiv Sena Legislature
एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधीमंडळ पक्षप्रमुखपदी म्हणून कायम ठेवण्याची ३४ बंडखोर आमदारांची मागणी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधली शिवसेनेची घुसमट आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ तत्वांशी होणारी तडजोड मान्य नसल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३४ आमदारांच्या स्वाक्षरीचे दोन प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सादर करण्यात आले.
एकनाथ शिंदे यांना १४ व्या महाराष्ट्र विधानसभेच्या शिवसेना विधीमंडळ पक्षप्रमुखपदी म्हणून कायम ठेवावं. तसंच मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड तात्काळ रद्द करून त्या जागी भरत गोगोवले यांची निवड करावी, असं यात नमूद करण्यात आलं आहे.
महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदार संघातल्या मतदारांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. तसंच वैचारिक दृष्ट्या विरोधी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी केल्यामुळे मतदारांमध्येही रोष आहे, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आग्रही
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचं, शिवसेनेचं मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं आहे. असं त्यांनी म्हटलंय.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com