The youth should accept the role of the employer through industry
तरूणांनी उद्योगाच्या माध्यमातून नोकरी देणाऱ्याची भूमिका स्वीकारावी
– डॉ.प्रशांत नारनवरे
पुणे : जागतिकरणाच्या युगात उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध असून बहुजन समाजातील तरुणांनी या संधीचा फायदा घेत उद्योगविश्वात स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणाऱ्याची भूमिका निश्चितच समाज हितासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
समाज कल्याण विभाग व बार्टीच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय पर्वानिमित्त बार्टीच्या येरवडा येथील प्रशिक्षण केंद्रात बहुजन समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी तसेच नवउद्योजकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
डॉ.नारनवरे म्हणाले, बहुजन समाजातील नागरिकांनी संपूर्ण जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. विविध पदांपर्यंत ते पोहोचले आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनीदेखील स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारावे. त्याद्वारे समाजाचा विकासही साधता येईल.
कार्यशाळेत अग्रणी बँकेचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, महाराष्ट्र उद्योग विकास विभाग तसेच बार्टीचे अधिकारी यांनी उद्योग व्यवसायातील विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजना व औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य केलेल्या संस्थांचे प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित तरुणांना उद्योग व्यवसायातील विविध संधी, शासनाच्या विविध योजना, उद्योग उभारण्यासाठी आवश्यक गोष्टी, तंत्रज्ञानाची आवश्यकता, कौशल्य विकसित करण्याच्या बाबी, मनुष्यबळ, विविध साधनसामुग्री, उद्योगाचे व्यवस्थापन, यंत्रसामग्री यासह विविध विषयावर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे सुदामा थोटे, तसेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डिक्की) संतोष कांबळे, मुकुंद कमलाकर तसेच बँकांचे प्रतिनिधी प्रदीप बनकर, मंगेश माने, शासनाच्या विविध महामंडळाचे प्रतिनिधी तसेच बार्टीचे उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख अनिल कारंडे यांनी मार्गदर्शन केले.
समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत चव्हाण यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा घेण्यामागची भूमिका विशद केली. समाज कल्याण विभागाच्या योजनेच्या माध्यमातून यशस्वी उद्योग उभारलेल्या उद्योजकांनीदेखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सचिन बनसोडे, अजित बनसोडे, मदन कुमार शेळके, प्रकल्प अधिकारी (एमसीडी) सुदाम थोटे, विभागीय प्रकल्प अधिकारी, (एमसीडी), शितल सोनटक्के, मदन कुमार शेळके आदी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com