राज्यात गणेशोत्सवासाठी तयारीचा उत्साह

Bhau_rangari_ganpatiश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The excitement of preparations for Ganeshotsav in the state

राज्यात गणेशोत्सवासाठी तयारीचा उत्साह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा

मुंबई : राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा  उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. आज हरितालिका व्रतानिमित्त घरोघरी हरितालिका पूजन करण्यात आलं. गणेशमूर्ती, आकर्षक मखरं, पूजेचं तसंच सजावटीचं सामान, रोषणाई इत्यादी साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. कोविड काळातल्या दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा गणेशोत्सव धामधुमीने साजरा करण्याचा उत्साह राज्यात दिसून येत आहे.  कोविड प्रसाराला बऱ्यापैकी आळा बसल्याने उत्सवावर गेली दोन वर्षं घातलेले निर्बंध  राज्यसरकारने यंदा हटवले आहेत. मुंबई पुण्यासह इतर अनेक शहरांमधे जागोजाग मंडप उभारण्यात आले आहेत.Dagdusheth_Halwai-Ganpati हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबईत अनेक गणेशोत्सव मंडळांनी आधीच गणेशमूर्ती मंडपात आणल्या असून उद्या विधिवत त्यांची प्रतिष्टापना करण्यात येईल. भाविकांची दर्शनासाठी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने तसंच मंडळांनीही अनेक उपाययोजना केल्या आहेत. मुंबईच्या प्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळाने ३१६ कोटी ४० लाख रुपयांचं विक्रमी विमाकवच स्वयंसेवक, पुरोहित, सुरक्षारक्षक इत्यादींसाठी घेतलं आहे. यात दागदागिने, मौल्यवान वस्तू गहाळ होणं ते वैयक्तिक अपघातापर्यंतच्या जोखिमींचा समावेश आहे. गणपतीसाठी कोकणातल्या गावाकडे मोठ्या संख्येने चाकरमानी रवाना झाले आहेत.

एस टी महामंडळाने त्यांच्यासाठी जादा गाड्यांची व्यवस्था केली असून अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी यंदा भाविकांसाठी मोफत एस टी प्रवासाची सोय केली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यातल्या दिमाखदार गणेशोत्सवातल्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीत सर्वप्रथम मानाच्या पहिल्या पाच गणपती मंडळांनाच जाण्याची संधी दिली जाते, याच विरोधात छोट्या गणेश मंडळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं देखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी.

आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प केला असून त्याच्यापूर्तीसाठी आपल्या मनातलं आमचं सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्याच्या विकासाचं मनोरथ पूर्णत्वास जाण्यासाठी आपली साथही हवी आहे. कोरोना संकटामुळं मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं येऊ देत, त्यांची तमा करायची नाही, अशी हिंमत बाळगुया. लाडक्या गणरायाचं स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडं घालतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा

भारतीय परंपरेत अग्रपूजेचे स्थान असलेल्या बुद्धीदेवता श्रीगणेशाच्या उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव जोरदार साजरा करतानाच पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ब्रिटीश राजवटीत समाजमन जागृत करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात आणि विदेशातही गणेशोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देश-विदेशात पोहोचली, ही अभिमानाची बाब आहे. सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना आपले सामाजिक दायित्वाचे पालन करण्याची परंपराही जोपासावी, गणरायाच्या आगमनाने वातावरणात उत्सव आणि आनंदाला भरते येत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजीही सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *