The first case of coronavirus XE subtype was found in Mumbai
कोरोनाच्या XE प्रकारच्या उपप्रकाराची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला मुंबईत
मुंबई : मुंबईत गेल्या महिन्यातच कोरोनाच्या ‘एक्सई’ या नव्या प्रकाराची लागण एका रुग्णाला झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकाराची लागण झाल्याचं आढळून आलेला हा देशातला पहिलाच रुग्ण आहे. कोविड १९ च्या विषाणूच्या जनुकीय सूत्राचं निर्धारण करणाऱ्या चाचण्या बृहन्मुंबई महानगरपालिका नियमितपणे करत आहेत.
या अंतर्गत अकराव्या तुकडीमध्ये मुंबईतल्या २३० रुग्णांमधल्या कोविड विषाणू नमुन्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष पालिकेनं आज जाहीर केले.
यात ‘ओमायक्रॉन’ चे २२८ अर्थात ९९ पूर्णांक १३ शतांश टक्के रुग्ण आढळले आहेत. उरलेल्या दोन बाधितांपैकी एक महिला रुग्ण ‘एक्सई’ उपप्रकारानं , तर अन्य एक जण ‘कापा’ उपप्रकारानं बाधित होता, असं निष्पन्न झालं आहे.
‘एक्सई’ उपप्रकारानं बाधित झालेल्या रुग्णानं चित्रिकरणाच्या निमित्तानं दक्षिण अफ्रिकेचा प्रवास केला होता.
परत आल्यावर १० फेब्रुवारीला तिची कोरोना चाचणी नकारात्मक आली होती. मात्र २ मार्चला नियमित चाचणीत ती बाधित असल्याचं आढळलं. तर, दुसऱ्या दिवशी दुसरीकडे केलेली चाचणी पुन्हा नकारात्मक आली होती, असं महापालिकेनं कळवलं आहे. या रुग्णाला कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या.
Hadapsar News Bureau