The first modern telemedicine centre in the country will be set up – Rajiv Chandrasekhar
देशातील पहिलं आधुनिक टेलिमेडिसीन केंद्र उभारण्यात येणार – राजीव चंद्रशेखर
पुणे : पुणे महापालिकेच्या बाबुराव शेवाळे रुग्णालयात देशातील पहिलं आधुनिक टेलिमेडिसीन केंद्र ( The first modern telemedicine centre )उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल केली.
या रुग्णालयाला आणि निरामय केंद्र म्हणजेच वेलनेस सेंटरला भेट देऊन माहिती घेतली यावेळी त्यांनी ही घोषणा केली. रुग्णालयातील कर्मचारी, डॅाक्टर्स आणि रुग्णालय आणि वेलनेस सेंटरचा लाभ घेणाऱ्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॅाक्टर आशीष भारती यांनी त्यांना माहिती दिली. शहरात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. याठिकाणी अत्यावश्यक सुविधा तितक्याशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णांना बाहेरील मोठया रुग्णालयात पाठवले जाते.
यामध्ये रुग्णांचा वेळ आणि पैसाही खर्च होतो. परंतु, एखाद्या रुग्णावर उपचार करत असताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास त्या रुग्णाला टेलिमेडिसीन सेंटरमध्ये पाठवले जाते.
व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मोठया रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संवाद साधला जातो. त्यानुसार त्या रुग्णावर पुढील उपचार केले जातात. काही वेळेला ऑफलाईन पद्धतीचाही उपयोग केला जातो.
रुग्णाचे पेपर स्कॅन करून मोठया सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना ऑनलाइनद्वारे पाठवण्यात येतात. त्यानंतर तेथील डॉक्टर या पेपरचा अभ्यास करून रुग्णांच्या उपचाराविषयी आवश्यक माहिती सांगतात.
पुण्यात उभारण्यात येणा-या महापालिकेच्या बाबुराव शेवाळे रूग्णालयात देशातील पहिले अत्याधुनिक टेलिमेडिसीन सेंटर उभारण्यात येणार असल्यामुळे पुण्याबरोबर इतरही जिल्हयातील रूग्णांना याचा लाभ घेता येणार आहे.
हडपसर न्युज ब्युरो