The first meeting of the G20 Working Group on Trade and Investment concludes in Mumbai
जी 20 अंतर्गत व्यापार आणि गुंतवणूक विषयावरच्या कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा मुंबईत समारोप
बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या G-20 सदस्य देशांच्या प्रस्तावाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचा पाठींबा
मुंबई : G 20 अंतर्गत व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा आज संध्याकाळी मुंबईत समारोप झाला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी समारोपाच्या सत्राला संबोधित केलं. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ हे स्वप्न साकार करण्यासाठी भारताकडचं प्राचीन ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची ही योग्य वेळ असल्याचं यावेळी त्यांनी या प्रतिनिधींना सांगितलं. लोकशाही, विविधता आणि सर्वसमावेशकता या देशात पुरातन काळापासून सुरू असल्याचं ते म्हणाले.
कठीण भू- राजकीय स्थिती आणि जागतिक पातळीवरील चिंताजनक आर्थिक वातावरणात भारताने जी 20 अध्यक्षपदाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला , 2023 हे भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष असल्याने, एक मध्यम मार्ग शोधत भारताला आपले प्राचीन ज्ञान जगासोबत सामायिक करण्याची ही योग्य वेळ आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारताच्या संपूर्ण गौरवशाली भूतकाळात देश लोकशाही, विविधता आणि समावेशकतेचा मशालवाहक राहिला आहे, असे गोयल यांनी सांगितले.
सर्वसमावेशक विकासासाठी प्रत्यक्ष फलनिष्पत्तीच्या दृष्टीने, व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची महत्त्वाची भूमिका असून केवळ जी 20 सदस्य देशांमध्येच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साउथमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी ही भूमिका सहाय्य्यकारी ठरेल, असा पुनरुच्चार पियूष गोयल यांनी केला.
बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या G-20 सदस्य देशांच्या प्रस्तावाला मंत्री पियुष गोयल यांनी दुजोरा दिला. सहयोग, शाश्वत विकास आणि उपाय -केंद्रित मानसिकतेद्वारे वाटचाल करणाऱ्या नव्या जगाच्या दिशेने प्रगती करण्यासाठी, विकसनशील आणि कमी विकसित देशांसह सर्व देशांच्या माध्यमातून आणि जागतिक व्यापाराच्या फायद्यांचे समान वितरण करण्याच्या मुद्दा त्यांनी जोरकसपणे मांडला.
वैश्विक मूल्य आणि मानवी दृष्टीकोनाला भारताच्या G-20 अध्यक्षतेच्या काळात प्राधान्य दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करेल तसंच भारत जागतिक पातळीवरच्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम स्थान असल्याचं गोयल यांनी यावेळी अधोरेखित केलं.
3 दिवस सुरू असलेल्या या बैठकीत जगभरातले 100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. आज MSME ला जागतिक व्यापारात प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर आणि कार्यक्षम मालवाहतूक सेवा उपलब्ध करण्यावर चर्चा झाली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com