Let the new generation experience the glorious history of Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नवीन पीढिने अनुभवावा
-शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांचे प्रतिपादन
नामदार चंद्रकांत पाटील आयोजित सांघिक किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
पुणे : छत्रपती शिवाजी महारांजानी अतिशय खडतर परिश्रम घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. आपले गडकोट किल्ले छत्रपतींच्या जीवनप्रवासाची साक्ष देतात. त्यामुळे, त्यांचे कार्य सर्वांनी अनुभवले पाहिजे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मतदारसंघात आयोजित सांघिक किल्ले बनवा स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते.
श्री. पांडुरंग बलकवडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांसाठी आदर्श आहेत. अतिशय खडतर परिश्रम घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. आपले गडकोट किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची नेहमीच साक्ष देत असतात. त्यामुळे त्यांचे कार्य आणि जीवन सर्वांनी अनुभवले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जसे जगले, जिथे त्यांचे वास्तव्य होते. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना घेऊन गेले पाहिजे. हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ले हे आपल्यासाठी तीर्थक्षेत्रेच आहेत. त्यामुळे आज आपल्या नवीन पीढिला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कसे निर्माण केले, हे सांगितले पाहिजे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ल्यांची सहल घडवली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर हेमंत मावळे यांनी पोवाडा सादर करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांनी केले. आशुतोष वैशंपायन यांनी आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष सुचित देशपांडे यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com