The importance of Pali and Buddhist studies was emphasized by the professors and students on Dr Babasaheb Ambedkar Jayanti
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पटवून दिले पाली व बौद्ध अध्ययनाचे महत्त्व
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती साजरी केली. विभागात चालविल्या जाणाऱ्या पाली व बौद्ध अध्ययन क्षेत्रातील पदविका व पदव्युत्तर अशा १६ अभ्यासक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने विभागातर्फे ‘पाली व बौद्ध अध्ययन जागरुकता अभियान’ राबविण्यात आले.
याकरिता पिंपरी येथील पालिका भवनासमोरील डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, दापोडी येथील त्रैलोक्य बौद्ध महाविहार, तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकरांचा पुतळा या तीन ठिकाणी माहिती कक्ष उभारण्यात आले.
माहितीकक्षांच्या माध्यमातून विभागातील अभ्याक्रमांची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली आणि अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या संभाव्य लोकांची आगाऊ नावनोंदणी करण्यात आली. पाली व बौद्ध अध्ययन या विषयांची ओळख होण्याच्या दृष्टीने विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनदेखील पिंपरी येथील माहितीकेंद्रात मांडण्यात आले होते. या अभियानात विभागातील अनेक आजी-माजी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
या उपक्रमासंबंधी बोलताना विभागप्रमुख प्रा. देवकर म्हणाले की, पाली व बौद्ध अध्ययनाशी संबंधित एकूण १६ अभ्यासक्रम विभागातर्फे चालवले जातात. त्यामध्ये पाली, बौद्ध संस्कृत, व तिबेटी या भाषा तसेच बौद्ध इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, कला, स्थापत्य, वारसा पर्यटन, समाजाभिमुख बौद्ध विचार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धम्मविषयक चिंतन या बौद्ध अध्ययनाशी संबंधित विषयांचा समावेश होतो.
सर्वसामान्य लोकांना या विषयांची फारशी माहिती नसते. तसेच त्यातील संधींची देखील त्यांना कल्पना नसते. हे विषय लोकाभिमुख करण्यासाठी आणि या विषयांच्या अभ्यासक्रमांना असणारा प्रतिसाद वाढविण्यासाठी विभागातर्फे मागील अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व बुद्धपौर्णिमा या दिवशी हे अभियान चालविण्यात येत होते. मागील दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे यात खंड पडला. परंतु या वर्षी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात हे अभियान राबविण्यात आले.
यावर्षीच्या अभियानाला तीनही माहिती केंद्रांच्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती विभागातील प्राध्यापक डॉ.तलअत प्रवीण , तृप्ती तायडे, दीपाली पाटील, रीतेश ओव्हाळ, प्रणाली वायंगणकर, डॉ. मृगेंद्र प्रताप व दीपक गायकवाड यांनी दिली.
या अभियानात सुमारे २५०० माहिती पत्रके वितरीत करण्यात आली व सुमारे ८०० इच्छुकांनी आगाऊ नावनोंदणी केली या इच्छुकांना विद्यापीठ प्रवेशप्रक्रिया सुरु झाल्यावर विभागाच्या कार्यालयाद्वारे संपर्क केला जाईल व प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले जाईल असे विभागातील प्रशासकीय कर्मचारी अतुल गुलालकर व विट्ठल पवार यांनी सांगितले. या अभियानाची दुसरी फेरी बुद्धपैर्णिमच्या दिवशी म्हणजेच १६ मे २०२२ रोजी राबविली जाणार असल्याचे प्रा. देवकर म्हणाले.
विद्यापीठामध्ये चालविल्या जाणाऱ्या विशिष्ट व महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांना लोकाभिमुख करण्याचा पाली व बौद्ध अध्ययन विभागाचा हा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय व अनुकरणीय म्हटला पाहिजे. यातून विद्यापीठ अधिक लोकाभिमुख होण्यास तसेच पाली व बौद्ध अध्ययनासारख्या विषयांत लोकांची रुची वाढण्यास मदत होईल. स्वतः पाली व बौद्ध अध्ययनाचे विद्वान असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीदिनी दिलेली ही खरी आदरांजली आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये, असेही प्रा. देवकर यांनी सांगितले.
हडपसर न्युज ब्युरो (Hadapsar News Bureau)