The result of the Konkan division is highest in the 10th examination and lowest in the Nashik division
१०वीच्या परीक्षेत कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नाशिक विभागाचा सर्वात कमी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च- एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र, अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
राज्यातले ९६ पूर्णांक ९४ शतांश टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. राज्यातले १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातले १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व विभागातून ९७ पूर्णांक ९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.
मुलांच्या उत्तीर्ण होण्याच्या तुलनेत हे प्रमाण १ पूर्णांक ९ दशांश टक्के अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९ पूर्णांक २७ शतांश टक्के तर नाशिक विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ९५ पूर्णांक ९ दशांश टक्के लागला.
पुणे विभागाचा निकाल ९६ पूर्णांक ९६ शतांश टक्के लागला आहे. तर मुंबई विभागातून ९६ पूर्णांक ९४ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
हे निकाल www.mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in , या संकेतस्थळांवर पाहता येतील.
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे verification.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून, स्वतः किंवा शाळांमार्फत ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी आवश्यक अटी, शर्ती आणि सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. गुणपडताळणीसाठी २० जून ते २९ जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी २० जूनपासून ९ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीनं शुल्क भरता येईल.
जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी २० जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्याबाबतचं परिपत्रक स्वतंत्रपणे जारी केलं जाईल, असं मंडळाच्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केलं आहे.
हडपसर न्युज ब्युरो